एचडीएफसी ते पंजाब नॅशनल बँकेसह विविध बँका एटीएम कार्डच्या वापराचे नियम बदलणार, पैसे काढणं महागणार
मुंबई

भारतात नवं आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2026 पासून सुरु होत आहे. एचडीएफसी बँकेसह इतर बँका एटीएम कार्डच्या वापरासंदर्भातील नियम बदलणार आहेत. यामध्ये एटीएम कार्डवरुन पैसे काढण्याचे नियम, एटीएम वापराचं शुल्क यासंदर्भातील विविध बदलांचा समावेश आहे.
एचडीएफसी बँक – एचडीएफसी बँक आता यूपीआय आधारीत पैसे काढणे देखील फ्री एटीएम व्यवहार मर्यादेत जोडेल. म्हणजेच यूपीआयद्वारे एटीएम मधून पैसे काढल्यास ते एटीएम व्यवहार मर्यादेशी जोडलं जाईल. ही मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांना एटीएम व्यवहारावर शुल्क द्यावं लागेल. नवा नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल.बँकेच्या नियमानुसार मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपयांचं शुल्क द्यावं लागेल.
एचडीएफसी बँकेनं महानगरांमध्ये मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा 3 व्यवहार ठेवली आहे. नॉन मेट्रो शहरांमध्ये 5 वेळा एचडीएफसी बँकेच्या एटीएम कार्डवरुन पैसे मोफत काढू शकतात. या सरकारी बँकेनं देखील एटीएम कार्डद्वारे पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे.
पंजाब नॅशनल बँकेचा नवा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. बँकेचे ग्राहक 1 एप्रिल पासून एटीएम कार्डचा वापर करुन एका दिवसात 1 लाख रुपयांऐवजी 50 हजार रुपये काढू शकतात. हा नियम काही डेबिट कार्डसाठी लागू असेल.
रुपे सिलेक्ट डेबिट कार्ड, पीएनबी रुपे सिलेक्ट नियो, पीएनबी रुपे सिलेक्ट एक्सल, व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्ड, मास्टर डेबिट कार्ड बिझनेस डेबिट कार्डची पैसे काढण्याची मर्यादा 1 लाख 50 हजारांवरुन 75 हजारांवर आणण्यात आली आहे. बंधन बँकेनं देखील डेबिट कार्डद्वारे मोफत पैसे काढण्याची संख्या कमी केली आहे.
आता ग्राहक बंधन बँकेच्या एटीएमद्वारे 5 वेळा मोफत पैसे काढू शकतात. इतर बँकांच्या एटीएममधून 3 वेळा मोफत पैसे काढू शकतात. मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 23 रुपयांचं शुल्क द्यावं लागेल.
जिओ पेमेंट बँक देखील क्यूआर आधारित पैसे काढण्याची सुविधा सुरु करणार आहे. याद्वारे ग्राहक यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करुन कोणत्याही बँक प्रतिनिधीकडे यूपीआयचा वापर करुन व्यवहार प्रमाणित पैसे काढू शकतात.




