
अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरातील ऐक्यनगर भागात राहणारे ६३ वर्षीय ज्येष्ठ वकील मधुसूदन पांडुरंग गात यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली आहे.
फिर्यादी गात हे दिवाळी सुट्टीनमित्त १२ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत, १२ नोव्हेंबर सकाळी नऊ ते १३ नोव्हेंबर सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी घराच्या गेटचे आणि दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
या चोरीमध्ये चोरट्यांनी अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, ५० हजार रुपये रोख रक्कम आणि कंपाऊंडमध्ये लावलेली काळ्या रंगाची हिरो एक्स्ट्रीम १६० आर मोटरसायकल (क्र. एमएच १६ डीवाय ४१३३) असा मोठा ऐवज चोरून नेला आहे.
चोरीची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.




