अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाकडून यंदा कर्मचाऱ्यांना सण अग्रीमची रक्कम देण्यात आलेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष..
अहिल्यानगर

कामगार युनियनचा २३ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा..
महाराष्ट्रातील विविध शासकीय कार्यालयांमधील तसेच महानगरपालिकांमधील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी सण अग्रीम दिले जाते. मात्र, अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाकडून यंदा कर्मचाऱ्यांना अद्याप सण अग्रीमची रक्कम देण्यात आलेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सण अग्रीमसह कर्मचाऱ्यांच्या विविध थकीत देणी मिळावीत, या मागणीसाठी महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने २३ नोव्हेंबर २०२६ पासून आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर व सचिव आनंद वायकर यांनी दिली.
युनियनने निवेदनात म्हटले आहे की, दिवाळी सणानिमित्त कर्मचाऱ्यांना सण अग्रीम मिळावे, यासाठी संदर्भीय पत्र तसेच शासन निर्णयांच्या आधारे यापूर्वीच प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती. याबाबत प्रशासनाशी चर्चाही झाली होती. मात्र, दिवाळी सण संपूनही अद्याप सण अग्रीमची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
सण अग्रीमबाबत वेळोवेळी संपर्क साधला असता आयुक्त व महानगरपालिकेतील इतर अधिकारी वसुलीचे कारण पुढे करून पैसे उपलब्ध नसल्याचे सांगतात. त्यामुळे सण अग्रीमची रक्कम देणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात येत असल्याचे युनियनने निवेदनात नमूद केले आहे.
मागील वर्षी म्हणजेच १ एप्रिल २०२५ ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेली वसुली आणि चालू वर्षी १ एप्रिल २०२६ ते १२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत झालेली वसुली पाहता दोन्ही वर्षांतील वसुली जवळपास सारखीच आहे. असे असतानाही मागील वर्षी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सण अग्रीम, कालबद्ध पदोन्नती तसेच इतर देणी अदा केली होती. यंदा मात्र निवडणूक कार्यक्रम, जनगणना कार्यक्रम, एस.आय.आर. यांसारखी अतिरिक्त कामे करूनही वसुली कर्मचाऱ्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत चांगली वसुली केली आहे. असे असतानाही जाणीवपूर्वक सण अग्रीम अदा न करून कामगार-कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप युनियनने केला आहे.
महानगरपालिका कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून विविध आर्थिक देणी प्रलंबित असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये कोर्ट कर्मचारी व हद्दवाढीतील कर्मचाऱ्यांचा पाचव्या वेतन आयोगाचा फरक, सेवानिवृत्त व कायम कर्मचाऱ्यांचा सहाव्या वेतन आयोगाचा फरक, कालबद्ध पदोन्नतीस पात्र असलेल्या कामगार-कर्मचाऱ्यांचा फरक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान, शिल्लक रजेचा पगार आणि भविष्य निर्वाह निधीच्या रकमा वेळेवर अदा केल्या जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
तसेच भविष्य निर्वाह निधीची कपात करूनही संबंधित रक्कम कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळत नाही. सोसायटीची कपात केलेली रक्कम वेळेवर जमा केली जात नाही. मागील दीड वर्षापासून वैद्यकीय परिपूर्तीची बिले अदा करण्यात आलेली नाहीत. एल.आय.सी.चे हप्ते वेतनातून कपात करूनही ते वेळेवर एल.आय.सी.कडे वर्ग केले जात नाहीत. याशिवाय सर्व कायम कामगार-कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची रक्कमही अद्याप अदा करण्यात आलेली नसल्याचे युनियनने म्हटले आहे.
महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या या सर्व थकीत रकमा सुमारे १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची देणी प्रलंबित असताना केवळ वसुलीचे कारण पुढे करून सण अग्रीम नाकारणे ही कामगार-कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी कृती असल्याचे युनियनने म्हटले आहे.
महानगरपालिका प्रशासनाच्या अडचणी समजून घेऊन युनियनने वेळोवेळी चर्चा करून सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र, सण अग्रीम आणि कर्मचाऱ्यांची सर्व थकीत देणी देण्याबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार २३ नोव्हेंबर २०२६ पासून महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर राहील, असा इशारा युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर व सचिव आनंद वायकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.



