
येथील छत्री तलाव परिसरात शहरातील हौशी कलावंतांनी ‘आपला शाडू मातीचा बाप्पा’ कार्यशाळा घेतली. रविवारी दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत गणपतीच्या मूर्ती साकारण्यात आल्या.
सांगितिक मैफलीच्या साथीने घेतलेल्या या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्वांनी आपापल्या घरी यावर्षी शाडू मातीचीच गणपती मूर्ती स्थापन करण्याचा संकल्प केला आहे.
घरोघरी मातीचा गणपतीच स्थापण्याचा संकल्प:छत्रीतलाव परिसरात हौशी कलावंतांची ‘आपला शाडू मातीचा बाप्पा’ कार्यशाळा काल रविवार साप्ताहिक सुटीचा दिवस असल्याने संबंधितांनी आपला वेळ सत्कारणी लावला.
आगामी गणेशोत्सव हा पर्यावरणपुरक व्हावा, यासाठी शाडू मातीच्या मोजक्या गणपती मूर्ती यावेळी तयार करण्यात आल्या. या मुर्तींचे शिल्पांकन व सादरीकरण हौशी कलावंतांमधील काही सहकाऱ्यांनी केले.
शिवाय गणेशोत्सवापूर्वी आवश्यक तेवढ्या मूर्ती तयार करुन यावर्षी त्याच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचेही ठरविण्यात आले. हौशी कलावंतांचे समन्यवक तथा शिल्पकलेत प्रवीण असलेले श्रीकांत बेलखेडे आणि अमित गावंडे यांनी यावेळी शाडू मातीच्या मुर्ती साकारल्या. निसर्ग व गणेशोत्सव हे नाते सर्वांच्या जवळचे आणि वेगळे आहे. गणेशाची निर्मिती मातीपासून होते आणि माती निसर्गालाच समर्पित केली पाहिजे. यासाठीच पर्यावरणपुरक गणेशोत्सव अनेक लोकं साजरा करतात. किंबहुना ती काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून पर्यावरणप्रेमी आणि कलाप्रेमी गणेशभक्तांनी मातीच्या मूर्तीविषयी जनजागृती करण्यासोबतच पूजनासाठी मातीच्या मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्पच घेतला आहे.
पीओपीच्या मूर्ती दिसायला आकर्षक असल्या तरी शाडूची माती पाण्यात लवकर विरघळते. त्यामुळे शाडूच्या मूर्तीकडे अधिक लोक वळत आहेत. तर काहींनी घरीच मूर्ती करण्याचे सुद्धा ठरविले आहे. आपल्या घरीच बाप्पाची मूर्ती घडवता यावी, सजवता यावी यासाठी लहान मुले व महिला वर्गात प्रचंड उत्सुकता असते. आपल्याला ही मूर्ती घडवता यावी, यासाठीच हे एकदिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सादरीकरण खुल्या जागेत करण्यात आले. तर संकलित माती व निर्माल्य याचे खतात रूपांतर करून परिसरातील वृक्ष संवर्धनासाठी वापर करण्याचा संकल्प निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळीचे संवाहक माजी सैनिक वसंत पाटील यांनी केला.
कार्यशाळेच्या कामकाजात प्रा. अनिल राऊत, प्रा. सुरेन धांडे, ॲड. आशिष हाडके, राजेश राऊत, नंदूभाऊ काकडे, प्राचार्य काळे, शशी डोंगरे, मनीष गवई, लहान मुले, महिला व मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.