श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर व साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने शिवमहापुराण कथा सप्ताहाचा प्रारंभ
अहिल्यानगर

शिवमहापुराण ही मानवी जीवनाला संस्कार, सदाचार आणि सकारात्मक विचारांची दिशा देणारी जीवनसृष्टी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
शिवमहापुराण ही केवळ धार्मिक ग्रंथकथा नसून मानवी जीवनाला संस्कार, सदाचार आणि सकारात्मक विचारांची दिशा देणारी जीवनसृष्टी आहे. भगवान शिव हे त्याग, तपस्या, करुणा, संयम आणि समतेचे प्रतीक आहेत. ‘शिव’ या शब्दाचा अर्थच कल्याण असून समाजातील प्रत्येक घटकाचे कल्याण व्हावे, हीच शिवतत्त्वाची शिकवण आहे. भगवान शिवांच्या विचारांत भेदभावाला स्थान नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते. त्यामुळे हा शिवमहापुराण कथा सप्ताह सामाजिक समरसतेचा संदेश देणारा ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
दिल्ली गेट येथे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर व श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या वतीने तसेच उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजित शिवमहापुराण कथा सप्ताहाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. कथा प्रवक्ते ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या रसाळ वाणीतून या कथेचे निरूपण होत आहे.

यावेळी आमदार संग्राम जगताप, पद्मश्री पोपटराव पवार, , माजी उपमहापौर अनिल बोरुडे, विनायक देशमुख, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, नगरसेवक निखिल वारे, ऋग्वेद गंधे, दत्ता गाडळकर, रोहन सानप, जालिंदर कोतकर, अभिजीत बोरुडे, मयूर बांगरे, संजय ढोणे, सुशांत जाधव, रवींद्र बारस्कर, जितू गंभीर,रोहन सानप, महिला बालकल्याण उपसभापती वर्षा सानप,गटनेते शारदाताई ढवन मा. नगरसेविका सुप्रिया जाधव आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी कै. कृष्णाभाऊ जाधव यांच्या विचारांचा वारसा धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे.
त्यांनी शहरात ‘हरित नगर’ ही संकल्पना राबवून पर्यावरण संतुलनाचा संदेश दिला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात चांगले काम सुरू आहे.
भगवान शिवांचे ध्यान, तपस्या आणि आत्मसंयम युवकांना व्यसनमुक्ती, शिस्त आणि ध्येयपूर्तीचा संदेश देतात. सध्याच्या परिस्थितीत हे संस्कार आचरणात आणण्याची खरी आवश्यकता आहे. अशा कथा सोहळ्यांमुळे नवीन पिढीला भारतीय आध्यात्मिक परंपरा, संस्कार आणि सांस्कृतिक वारशाची ओळख होईल. धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि सामाजिक भेदभाव दूर करून सद्विचार व सामाजिक एकोपा वाढविण्याचा संकल्प या शिवमहापुराण कथेतून केला जात आहे.
शिवमहापुराण कथेचे केवळ श्रवण न करता तिच्यातील विचार आपल्या आचरणात आणूया. भगवान महादेवांच्या विचारांची प्रेरणा घेऊन संस्कारक्षम आणि सेवाभावी समाज निर्माण करूया. ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून यापूर्वी श्री साईबाबांची कथा आणि आता शिवमहापुराण कथेचे आयोजन करून धार्मिक कार्याचा प्रसार व प्रचार केला जात आहे, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
आयोजक उपमहापौर ॲड. धनंजय जाधव म्हणाले की, सिद्धी बागेतील सिद्धेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन मंदिर असून जागृत देवस्थान म्हणून त्याची ओळख आहे. यानिमित्त कथा प्रवक्ते ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या रसाळ वाणीतून शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला आहे. कथा श्रवणासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी दहा हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली असून महाप्रसादाचेही आयोजन केले आहे.
पुढील पिढीला केवळ संपत्तीच नव्हे, तर धार्मिक आणि नैतिक संस्कारांचा वारसा मिळावा, या उद्देशाने शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने उत्साहात मिरवणूक काढून कथेला प्रारंभ करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी शिवमहापुराण कथेचे आयोजन करून धार्मिकतेचा वारसा जोपासण्याचे काम केले आहे. पुढील पिढीला आध्यात्मिक आणि धार्मिक विचारांची खरी गरज आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणे आवश्यक आहे. ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या मधुर वाणीतून संत मंतांचे आणि धार्मिकतेचे विचार पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत आहे, असे त्यांनी सांगितले.
शिवमहापुराण कथा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कथा प्रवक्ते ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी शिवमहापुराण माहात्म्य आणि विद्येश्वर संहितेचे निरूपण केले. भगवान महादेवांचे महत्त्व मानवी जीवनात किती अनन्यसाधारण आहे, हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, विष ओठात आणि पोटातही असू नये. पोटात विष असेल तर आपण मरतो, तर ओठात विष असेल तर दुसरा माणूस मरतो. चांगल्या व्यक्तींना आपण चांगले म्हणत नाही, तोपर्यंत वैभवशाली जीवन जगता येणार नाही. केवळ कपाळाला गंध लावल्याने काही साध्य होत नाही, तर आपल्या चारित्र्याचा सुगंध सर्वत्र दरवळला पाहिजे. भोलेनाथ हे सर्वांचे देव आहेत. सत्य, सदाचार आणि चांगल्या विचारांचे महत्त्व जीवनात जपले पाहिजे, असे सांगत त्यांनी विविध उदाहरणांमधून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.



