संत रोहिदास विकास केंद्राच्या प्रलंबित बिलासाठी ७५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी,१२ नोव्हेंबर रोजी सापळा कारवाई..
अहिल्यानगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी कारवाई केली. अहिल्यानगर येथील समाजकल्याण कार्यालयातील समाजकल्याण निरीक्षक संदीप हरिभाऊ फुंदे यांच्याविरुद्ध ७५ हजार रुपयांच्या लाचेच्या मागणीप्रकरणी सापळा कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान संबंधित लोकसेवकाला दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.२२ वाजता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार हे शासकीय कामाशी संबंधित असून, अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील मौजे केडगाव येथील सर्व्हे क्रमांक ४९/२ आणि ५०/१ येथे संत रोहिदास विकास केंद्र उभारण्याचे काम करण्यात आले होते.
या कामासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. तक्रारदारांनी संबंधित काम पूर्ण केले होते. मात्र, या कामाचे सुमारे २५ लाख रुपयांचे बिल अद्याप प्रलंबित असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
७५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी समाजकल्याण निरीक्षक संदीप फुंदे यांनी तक्रारदारांना फोन करून कार्यालयात भेटण्यास सांगितले होते.
त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी समाजकल्याण कार्यालयात पडताळणी व सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी प्रलंबित कामाच्या संदर्भात ७५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
एसीबीच्या सापळा कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ
या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून, संबंधित लोकसेवकाला दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.२२ वाजता ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणी अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
सापळा अधिकारी व वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस हवालदार संतोष, पोलीस हवालदार रवी निमसे, पोलीस कॉन्स्टेबल कराड आणि पोलीस हवालदार हारुण शेख यांचा समावेश होता.
या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतारे यांचे मार्गदर्शन लाभले.




