सायबर पोलिसांची मोठी कामगिरी – ई-मेल हॅकिंगमधील 13.56 लाख हस्तगत
अहिल्यानगर

अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका कंपनीची ई-मेल हॅकिंगद्वारे झालेली तब्बल १३ लाख ५६ हजार ९५७ रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आणली असून, फसवणूक झालेली ही संपूर्ण रक्कम फिर्यादीस सुरक्षितपणे परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे.
फिर्यादी कंपनीचे एका ग्राहक कंपनीकडून माल किंवा सेवा पुरविल्याबद्दलचे पेमेंट येणे बाकी होते; हीच संधी साधून अज्ञात सायबर गुन्हेगाराने फिर्यादी कंपनीचा ई-मेल आयडी हॅक केला आणि कंपनीच्या हुबेहूब लेटरहेडचा वापर करून बँक खाते तपशील बदलून बनावट चेक तयार केला.
हा बनावट तपशील ई-मेलद्वारे ग्राहक कंपनीला पाठवून दोन वेळेस मिळून एकूण १३ लाख ५६ हजार ९५७ रुपये सायबर गुन्हेगाराच्या खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडले. ही रक्कम फिर्यादीच्या मूळ खात्यात न पोहोचल्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आणि अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर ढिकले, तपास अधिकारी सुदाम काकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब हिंगे यांच्या पथकाने तात्काळ तपास चक्र गतीने फिरवून, बँकांशी समन्वय साधत तांत्रिक पाठपुरावा केला आणि फिर्यादीची हक्काची संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली.




