ॲम्बुलन्स न मिळाल्याने गमावला मुलगा, दुःखाचा डोंगर बाजूला सारून घडवले माणुसकीचे दर्शन..

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात वेळेत रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) न मिळाल्याने आपला २७ वर्षीय तरुण मुलगा विवेकला गमावणाऱ्या नवनागापूर येथील आजबे कुटुंबीयांनी आपल्या दुःखाचे रूपांतर समाजसेवेत करत, विवेकच्या स्मृतीप्रित्यर्थ ३ नोव्हेंबर २०२६ रोजी एका नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करून ती समाजाला भेट दिली.
२७ मे २०२५ रोजी विवेक आजबे आपल्या कुटुंबासह एका कार्यक्रमासाठी समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला होता. त्यावेळी ‘१०८’ रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे वेळेवर उपचार न मिळून विवेकचे दुर्दैवी निधन झाले होते. आपल्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर मनामध्ये बाळगून, भविष्यात वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे इतर कोणत्याही कुटुंबाचा डोळयादेखत असा जीव जाऊ नये, या उदात्त आणि संवेदनशील हेतूने विवेकच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आजबे कुटुंबाने स्वतः नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
या भावनिक सोहळ्यात ज्ञानेश्वर आजबे यांनी हा उपक्रम खऱ्या अर्थाने माणुसकीचा आणि सामाजिक बांधिलकीचा दीपस्तंभ असल्याचे सांगितले, तर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार काशिनाथ दाते यांनी विवेकच्या मृत्यूचा प्रश्न थेट विधानसभेत उपस्थित केला होता.



