बाहेर आल्यावर गोळ्या घालू.. 5 सराईत गुन्हेगारांकडून कारागृह पोलिसांना जीवे मारण्याची धमकी.
अहिल्यानगर

अहिल्यानगर येथील सबजेलमध्ये सोमवारी (२ नोव्हेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या कारागृह पोलिसांना शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याचा आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला.
कारागृहात गांजा पिण्यास प्रतिबंध केल्याच्या रागातून नीलेश बाळासाहेब जाधव, विजय राजू पठारे, गणेश उर्फ टिंग्या म्हसुदेव पोटे, मयूर अनिल आगे आणि अबुजर लतिफ राजे या पाच बंदी आरोपींनी कारागृह पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना जीवे मारण्याची व संपूर्ण खानदान संपविण्याची धमकी दिली.
कारागृह पोलीस मयूर गोरख धामोरे आणि पोलीस अंमलदार सुनील विधाते हे नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर असताना बंदी नीलेश जाधव बंदी असलेल्या भागात लपलेला दिसला. त्याची विचारपूस केली असता त्याने वाद घालण्यास सुरुवात केली, ज्यानंतर विजय पठारे व त्याचे इतर साथीदार तेथे जमा झाले.
त्यांनी पोलिसांवर धावून जात “आम्ही खाकीला घाबरत नाही, आम्ही सराईत गुन्हेगार आहोत, बाहेर आल्यावर गोळ्या घालू” अशी धमकी दिली. याप्रकरणी मयूर धामोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




