पुण्यातील महाट्रेड नावाच्या कंपनीने तब्बल १० हजार गुंतवणूकदारांची ३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक फसवणूक
पुणे

दरमहा १५ ते १६ टक्के निश्चित परतावा, घरबसल्या मोबाईलवरून ट्रेडिंग आणि काही महिन्यांत श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून पुण्यातील एका महाठकीचा मोठा कारनामा उघडकीस आला आहे.
‘महाट्रेड’ नावाच्या कंपनीने तब्बल १० हजार गुंतवणूकदारांची ३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आता संतप्त गुंतवणूकदारांकडून केला जात आहे. कष्टाचा पैसा, भविष्याची पुंजी आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी साठवून ठेवलेले सगळे पैसे एका रात्रीत गायब झाल्यामुळे पुणे आणि परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीने बाजारात विविध आकर्षक ट्रेडिंग स्कीम्स आणल्या होत्या. लोकांच्या पैशांचे शेअर मार्केट किंवा मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नियोजन करून कमी कालावधीत बक्कळ नफा मिळवून दिला जाईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. सुरुवातीला काही जणांना अल्प प्रमाणात परतावा देऊन कंपनीने लोकांचा पूर्ण विश्वास संपादन केला.
लोकांचा विश्वास बसल्यानंतर अनेकांनी स्वतःची बचत, घराची विक्री केलेले पैसे आणि सोन्याचे दागिने विकून लाखो-कोटी रुपये या कंपनीत ओतले. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष पैसे काढण्याची वेळ आली, तेव्हा कंपनीचे अधिकारी नॉट रिचेबल झाले.
या प्रकरणातील एक मोठी बळी ठरलेल्या मावळ तालुक्यातील गहूंजे येथील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी एआय आधारित ट्रेडिंगचे आमिष दाखवले होते.
या महिलेने आणि तिच्या कुटुंबाने महाट्रेड आणि ट्रेडवे या कंपन्यांमध्ये मिळून करोडो रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला काही रक्कम परत मिळाली, परंतु मोठी रक्कम थकीतच राहिली. या संपूर्ण प्रकरणात गुंतवणूकदारांनी महाट्रेड कंपनीचे मुख्य संचालक सुहास रायकर, देविदास रायकर, शोभा रायकर आणि तेजश्री पाटेकर यांच्यावर फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत.
डिसेंबर २०२५ पासून परतावा पूर्णपणे बंद झाल्यानंतर, संचालकांनी खाती फ्रीज झाल्याचे आणि १२५ दिवसांत पैसे परत करण्याचे खोटे बहाणे सांगत गुंतवणूकदारांची दिशाभूल केली. एवढेच नव्हे तर, ‘टेडी’ नावाचे नवीन ॲप आणून पुन्हा फसवणुकीचा सपाटा सुरू ठेवल्याचा आरोपही पिडितांनी केला आहे.
सध्या या कंपनीचे कार्यालय बंद असून, मुख्य संचालक सुहास रायकर हे परदेशात पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे. न्याय मिळावा आणि कष्टाची मुद्दल परत मिळावी म्हणून राज्यभरातून आलेल्या शेकडो त्रस्त नागरिकांनी पुणे येथील खराडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. एका पिढीने आयुष्यभर राबून उभे केलेले घर आणि भविष्यासाठी साठवलेले सेवानिवृत्तीचे पैसे एका रात्रीत धुळीस मिळाल्यामुळे अनेक कुटुंब आज उध्वस्त झाली आहेत.
अशा प्रकारच्या वाढत्या आर्थिक फसवणुकीपासून स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती पैसे गोळा करत असताना ती आरबीआय (RBI), सेबी (SEBI) किंवा इतर अधिकृत संस्थांकडे नोंदणीकृत आहे की नाही, हे खात्रीशीरपणे तपासले पाहिजे.
सुरक्षित सरकारी योजनांच्या किंवा बँकेच्या तुलनेत जर कोणी अवघ्या काही दिवसांत पैशांच्या दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे स्वप्न दाखवत असेल, तर तिथेच सावध होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सोशल मीडिया किंवा टेलिग्राम-व्हॉट्सॲपवरील अनोळखी ग्रुप्सच्या माध्यमातून येणाऱ्या भूलथापांना बळी न पडता, नेहमी अधिकृत आणि कायदेशीर फायनान्शियल ॲडव्हायझरचा सल्ला घेणेच केव्हाही हिवताच ठरते.




