पुण्यात मोरपंख साडीज या कापड व्यावसायिकाची तब्बल 1.59 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, पती-पत्नीवर गुन्हा दाखल!
पुणे

कापड व्यवसायात मदतीसाठी नियुक्त केलेल्या पती-पत्नीने विश्वासाचा गैरफायदा घेत तब्बल १ कोटी ५९ लाख २३ हजार ८१४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चंदननगर परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी पूनम मनोज शिराळ आणि मनोज दिगंबर शिराळ (दोघे रा. खराडी) यांच्याविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहिनी औताडे (वय ४३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी आपल्या ‘मोरपंख सारीज’ या दुकानाच्या ऑनलाइन-ऑफलाइन विक्रीसह आर्थिक व्यवहारांची जबाबदारी आरोपी दाम्पत्याकडे सोपवली होती. मात्र, दुकानातील खरेदी-विक्रीचे हिशोब न दिल्याने आणि आर्थिक नोंदींच्या तपासणीत मोठी रक्कम शिल्लक असल्याचे दिसून आल्याने त्यांना संशय आला.
आरोपींनी दुकानातील रक्कम आणि मालाचा अपहार केल्याचा, जीएसटी क्रमांक व सोशल मीडिया खात्यांचा गैरवापर केल्याचा, तसेच सीसीटीव्ही फुटेज नष्ट करून धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.
सदर बातमी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीतील तपशिलांच्या आधारे देण्यात आली आहे. फिर्यादीमध्ये केलेले आरोप म्हणजे आमचा स्वतंत्र निष्कर्ष किंवा मत नाही. संबंधित आरोपांची सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून निश्चित होईल.




