विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच…
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि माध्यमांच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांमधील शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी स्विफ्टचॅट ॲपमधील ‘स्मार्ट उपस्थिती’ या चॅटबॉटचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत आता शिक्षकांच्या उपस्थितीवरही डिजिटल पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे.
राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांनी नियमितपणे ऑनलाइन उपस्थिती नोंदविणे अपेक्षित आहे. यामुळे शिक्षकांच्या शाळेत येण्याच्या आणि जाण्याच्या वेळांची नोंद उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील ५,००० पेक्षा अधिक शिक्षकांना या प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. शाळांच्या वेळांनुसार उपस्थिती नोंदविण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाकडून या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षकांची उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात आहे की नाही, यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे शाळांमधील उपस्थिती व्यवस्थापन अधिक सुलभ होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
कोणाला नियम लागू ?
सर्व व्यवस्थापनांच्या आणि माध्यमांच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांतील शिक्षकांसाठी ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे.शिक्षकांना स्विफ्टचॅट ॲपमधील ‘स्मार्ट उपस्थिती’ चॅटबॉटच्या माध्यमातून हजेरी नोंदवावी लागणार आहे.
पीडीएफ अहवालाची सुविधा उपलब्ध
नोंदविलेल्या उपस्थितीचा अहवाल पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येणार असल्याने शाळांना उपस्थितीची माहिती जतन करणे शक्य होईल.

