अहिल्यानगर जिल्ह्याचा पाणीटंचाई निवारणासाठी २६० कोटींचा आराखडा.

आगामी वर्षातील जूनपर्यंत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने सुमारे २६० कोटी रुपये खर्चाच्या विविध उपाययोजनांचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावित केला आहे. त्यामध्ये माणसांसह जनावरांना टँकरने पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासह जलस्रोतांचे बळकटीकरण, नळपाणी योजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या नळपाणी योजना तयार करणे, अशा विविध योजना उपाययोजनांचा समावेश आहे.
जिल्ह्याच्या विशेषतः दक्षिण भागात अधिक पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सध्या जिल्ह्यात १९३ गावे १०९५ वाड्यावस्त्यांसाठी २०४ टँकरमार्फत रोज ३ लाख ८७ हजार १६४ लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. टँकरच्या एकूण ८५६ खेपा रोज होत आहेत.
जिल्हा परिषद दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीसाठी पाणी टंचाई निवारण आराखडा तयार करते. त्यातील प्रामुख्याने खर्च टँकरने पाणीपुरवठासाठीच होत असतो. गेल्यावर्षी २९ कोटी रुपये खर्चचा आराखडा होता तर त्यापूर्वी ७० कोटी रुपये खर्चाच्या आराखड्याला मान्यता मिळाली होती. पावसाच्या प्रमाणानुसार आराखड्यातील उपाययोजनांचे खर्च वाढत जातात.


