नगरच्या डॉ.धनश्री खरवंडीकर यांना मानाचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर
अहिल्यानगर

जिल्ह्यातून आहेत संगीतातील पहिल्या डॉक्टरेट…
अहिल्यानगर येथील संगीत व संगीत नाटक अभ्यासक, गायिका आणि दिग्दर्शिका डॉ. धनश्री खरवंडीकर यांना पुणे येथील प्रतिष्ठित ‘भारत गायन समाज’ या संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘नटसम्राट बालगंधर्व स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा गौरव सोहळा येत्या १५ नोव्हेंबर रोजी पुणे येथील भारत गायन समाज येथे पार पडणार आहे. डॉ. खरवंडीकर यांनी संगीत नाटक क्षेत्राचे संवर्धन, नव्या पिढीला शास्त्रीय व नाट्यसंगीताचे शिक्षण देणे, तसेच गेल्या २० ते २५ वर्षांपासून संगीत नाटकांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या भरीव योगदानाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्या ज्येष्ठ गायिका अभिनेत्री पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्या शिष्या असून, ज्येष्ठ गायिका कीर्तीताई शिलेदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नाट्यसंगीतात डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे.
त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगीत क्षेत्रातील पहिल्या डॉक्टरेट आहेत. त्यांनी ‘श्रुती संगीत निकेतन’च्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले असून, सध्या त्या ‘श्रुती संगीत निकेतन’ आणि ‘बंदिश सांगीतिक कला प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी संगीत सौभद्र, मानापमान, संशयकल्लोळ यांसारख्या जुन्या संगीत नाटकांचे आणि संगीत जातककथा, अपूर्वयोग यांसारख्या नवीन नाटकांचे यशस्वी दिग्दर्शन व अभिनय केला असून, त्यांच्या या यशाबद्दल अखिल भारतीय नाट्यपरिषद, अहिल्यानगर शाखेसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




