
अहिल्यानगर महानगरपालिकेने तब्बल १६ वर्षांनंतर शहरातील लहान-मोठ्या ३६८ प्रकारच्या व्यावसायिकांच्या वार्षिक परवाना (लायसन्स) शुल्कात १६० टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मनपाच्या ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या महासभेत या करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या नवीन निर्णयामुळे आता रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांपासून (उदा. नारळपाणी, खेळणी, फुले विक्रेते) ते मंगल कार्यालये आणि फाईव्ह स्टार हॉटेल्सपर्यंत सर्वांनाच आर्थिक फटका बसणार आहे.
या दरवाढीनुसार व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार वार्षिक किमान ५२० रुपयांपासून ते कमाल ६५ हजार रुपयांपर्यंत शुल्क मोजावे लागणार आहे. गेल्या १६ वर्षांत शुल्कात कोणतीही वाढ न झाल्यामुळे, दरवर्षी १० टक्के याप्रमाणे एकत्रित १६० टक्के शुल्कवाढ करण्यात आली आहे.
महापालिकेच्या परवाना विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या धोरणामुळे शहरातील सर्व अधिकृत व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक राहील. पालिकेच्या उत्पन्नात मोठी भर घालणे आणि प्रशासकीय महसूल मजबूत करणे हा या व्यापक दरवाढीमागील मुख्य उद्देश आहे.




