नगर शहरातील 42 रस्त्यांचे रुपडे पालटणार, 488 कोटींचा प्रस्ताव, शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
अहिल्यानगर

अहिल्यानगर महापालिकेने शहरातील रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम आणि खड्डेमुक्त करण्यासाठी ४८८ कोटी ६३ लाख रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्ताव तयार केला आहे.
नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर निधीतून शहरातील २३ रस्त्यांची कामे सध्या अंतिम टप्प्यात असतानाच, आमदार संग्राम जगताप यांच्या पत्रानुसार महापालिका प्रशासनाने आणखी ४२ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा हा नवीन प्रकल्प अहवाल तयार केला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या महासभेत या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली असून आता हा प्रस्ताव राज्य शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
या प्रकल्पात शहरातील मध्यवर्ती भागासह सावेडी, केडगाव आणि इतर उपनगरांतील श्रीराम चौक ते संघर्ष चौक, तोफखाना पोलीस ठाणे ते भिस्तबाग चौक, नेप्ती नाका ते आयुर्वेद चौक, दिल्ली गेट ते सबजेल चौक यांसारख्या प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे.
केवळ रस्त्यांचे काँक्रिटीकरण एवढ्यापुरता हा प्रकल्प मर्यादित नसून, यामध्ये पावसाळी गटारींची निर्मिती, महापालिका हद्दीतील विद्युत खांबांचे स्थलांतर, रस्ता दुभाजक आणि वृक्षलागवड या कामांचाही समावेश करण्यात आला आहे.
यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लागण्यासोबतच पाण्याचा निचरा सुधारेल आणि शहराच्या पायाभूत सुविधांना मोठी बळकटी मिळून विकासाला नवी दिशा मिळणार आहे.




