ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

संगीता डोंगरे जिल्हा बँकेच्या नव्या प्रशासक.. तीन महिन्यात तिसर्‍यांदा बदल

अहिल्यानगर

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकपदी अतिरिक्त निबंधक (सहकारी संस्था) संगीता डोंगरे यांची पदोन्नती नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच प्रशासक पदात गेल्या तीन महिन्यात झालेला हा तिसरा बदल आहे.

दरम्यान श्रीमती डोंगरे आज बुधवारी प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धुरा सध्यातरी नाशिक विभागाची विभागीय सहनिबंधक यांच्याकडेच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

संचालक मंडळाची मुदत गेल्या फेब्रुवारीमध्ये संपली. त्यानंतर मे मध्ये बँकेवर जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांची एक सदस्यीय प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये राज्य सरकारने गेल्या महिन्यात बदल करून विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा विशेष लेखापरीक्षक निकाळजे व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.

आता पुन्हा प्रशासक मंडळा ऐवजी एक सदस्यीय प्रशासक म्हणून अतिरिक्त निबंधक संगीता डोंगरे यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे.

डोंगरे यापूर्वी सन 2016 ते 2018 या दरम्यान प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून नगरमध्ये नियुक्त होत्या. त्यानंतर त्यांनी मुंबई (सिडको), पुणे बाजार समितीच्या सचिव म्हणून काम पाहिले. त्या सध्या कोल्हापूर येथे प्रादेशिक साखर संचालनालयात नियुक्त होत्या. तेथून त्यांची नगरला जिल्हा बँकेच्या प्रशासक म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.

सध्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. त्यासाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी सभासद संस्थांकडून ठराव मागवलेले आहेत. या ठरावांचे संकलन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे झालेले आहे. बँकेच्या सभासद संस्थांनी निकष व अटी, नियमानुसार ठराव केलेले आहेत की नाही याची पडताळणी करण्यासाठी हे ठराव नाशिक विभागीय निबंधक कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर होऊन त्यावर हरकती व दावे मागवले जातील त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

गणेश पुरी प्रादेशिक साखर सहसंचालक

गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या नगरच्या सहाय्यक सहसंचालक (साखर) या पदावर यापूर्वी नगर जिल्ह्यात जिल्हा उपनिबंधक म्हणून काम केलेले गणेश पुरी यांची नियुक्ती झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच पदोन्नतीने नगरहून पुरी यांची जिल्हा बाहेर बदली झाली होती.

त्यानंतर पुन्हा मंगळवार (दि. 28) रोजीपुन्हा पुरी यांची नगरच्या साखर सहसंचालक पदावर बदली झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे