मनभावन श्रावण – या विषयावर हिरकणी सौ.अनिता गुजर यांनी खुपच छान असा लेख लिहिलाय तो नक्कीच वाचा..
मुंबई - डोंबिवली

मनभावन श्रावण
नाना रंगात रंगे
इंद्रधनू अवतरे
ऊन पावसाच्या संगे ..!!
फुले मनमोर पिसारा
प्रत्येक स्त्रीचा श्रावणात
व्रत वैकल्ये,पूजा अर्चा
करतात आनंदात…!!
नवतीची नवलाई
चहूकडे हिरवळ
जाई,जुई, मोगऱ्याचा
अंतरात दरवळ…!!
श्रावण म्हणजे काय असे कोणालाही विचारले तरी सर्वाच्या समोर निसर्गाचं मनमोहक रूप उभे राहते. श्रावण म्हणजे वसुंधरेचे बहरणे,चहूकडे हिरवळ,नात्यातील ओलावा,श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा खेळ, अशी किती तरी श्रावणाची रूपे आपणाला सांगता येतील. श्रावण म्हणजे एक मांगल्याचे प्रतीक असलेला महिना असे वर्णन करता येईल. श्रावण महिना म्हणजे सगळ्या ऋतूंचा राजा मानतात.अशा नटलेल्या श्रावणात जेव्हा सप्तरंगी इंद्र्धनुष्य आकाशात उमटते तेव्हा अंतरात प्रीत उसळून येते.आषाढसरी कमी झालेल्या असतात आणि छान ऊन-पावसाचा खेळ सुरू झालेला असतो. अवघी सृष्टी पाचूसारखी हिरवी भासते या महिन्यात.श्रावण म्हणजे आल्हाददायी ऋतू आणि त्यात सणवारांची रेलचेल, त्यामुळे आबालवृद्धांना हा महिना हवाहवासा वाटतो.
पारंपरिक सणासुदीला श्रावणापासूनच सुरुवात होते. स्त्रियांसाठी हा महिना म्हणजे आनंदसोहळाच. सोमवारचा उपवास, मंगळागौरीचे खेळ, शुक्रवारचं हळदीकुंकू अशा अनेक प्रथा-परंपरा आजही पाळल्या जातात. त्यामध्ये भेटी-गाठी, खेळ आणि उत्साह हाच आजचा उद्देश असावा. श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात.
श्रावणातील व्रते म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष साधनेचे मार्ग नाहीत. अतिशय तरलपणे काहीतरी शिकवण देणारी किंवा एकमेकांतील नाते संबंध जपणारी, ती वृद्धिंगत करणारी एक भावनिक; पण विशिष्ट नियमात जगणारी अमृत महिरप आहे ती.श्रावणात माहेरपणाला महत्त्व आहे. माहेरची ओढ आणि श्रावण बरोबरीनेच येतात. त्यामुळे स्त्रीवर्गाला सुखावणारा, विरंगुळा देणारा हा व्रत-वैकल्यांचा महिना सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. पुरणपोळी, सांदण, चणे-फुटाणे असे चोचलेही श्रावण पुरवतो तसं एकत्र येण्याचं निमित्तही देतो. इतरवेळी सुख दुःखाच्या भोवऱ्यात अडकलेली स्त्री श्रावण येताच तिचा मनमोर पिसारा फुलवून मनसोक्त व्यक्त होते.पावसाच्या स्पर्शाने फुलून आलेल्या जाई,जुई,मोगरा,इत्यादी फुलांचा सुगंध मनात भरून मुग्ध होते आणि नकळत आतून मन हुंकार येतो…श्रावण..
असा हा श्रावण महिना घेऊन येतो आनंद, उत्साह आणि जगण्याची नवी उमेद. वर्षभराची ऊर्जा देणारा हा श्रावण महिना आरोग्य,पर्यावरण,संस्कृतीचा सर्वांगीण विचार करणाराच आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही….हो ना..?




