भाड्याच्या घरात रंग द्यायचा असेल तर खर्च कोणी करावा? भाडेकरू की मालकाने…

दसरा-दिवाळी येताच बरेच लोक आपल्या घरात साफ-सफाई आणि रंगकाम सुरू करतात. घर स्वत:च असो की भाड्याचं नेहमी नीटनेटकं आणि स्वच्छ दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर रंगकामाचा खर्च आपण करायचा की मालक करणार असा प्रश्न अनेक भाडेकरूंना पडतो. भाड्याच्या घरासंबंधीची नियमावली समजून घेऊ.
● सगळ्यात आधी भाडेकरू आणि मालक यांच्यामध्ये झालेल्या एग्रीमेंटमध्ये याबाबत काय नमूद करण्यात आलं आहे हे पाहायला हवं. जर रेंट एग्रीमेंटमध्ये रंगकाम आणि दुरूस्तीची जबाबदारी भाडेकरूंकडे असल्याचं नमूद केलं नसेल तर साधारणपणे घराची दुरूस्ती आणि पेटींगचा खर्च घर मालकाची जबाबदारी मानली जाते.
● महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा तसंच स्थानिक नियमांनमुसार घराची देखभाल आणि मुख्य दुरूस्ती करण्याची प्राथमिक जबाबदारी ही घर मालकाची असते. जास्तवेळ राहिल्यास तसंच नवीन भाडेकरू येण्यापूर्वी होणाऱ्या कामांचा खर्च घरमालकानेच करणं अपेक्षित असतं. मुंबई आणि महाराष्ट्रात लीव्ह एण्ड लायसन्स करारानुसार यात रंगकामाचा खर्च भाडेकरूचा असेल असं नमूद असल्यास तो खर्च भाडेकरूंना करावा लागतो.
● जर कोणी भाड्याच्या घरात राहत असेल आणि भिंतींचा रंग निघाला असेल आणि सणांच्या आधी घराला नवीन रंग द्यायचा असेल आणि भाडेकरूंनी भिंती खराब केल्या नसतील तर रंगकामाचा खर्च हा मालकाची जबाबदारी असते.
● घरात भाड्याने राहणाऱ्या भाडेकरूंच्या निष्काळजीपणामुळे किंवा घर व्यवस्थित मेंटेन न केल्यामुळे डाग पडले असतील, रंग निघाला असेल किंवा खिळे मारले असतील आणि एग्रीमेंटमध्ये घर सोडताना पूर्व स्थितीत देणे आवश्यक असल्याचं नमूद केलं असेल तर तो खर्च भाडेकरूंना करावा लागतो. अशा स्थितीत घर मालक रकमेतून रंगकामाचे पैसे कापून घेतात. नोंद नसल्यास किंवा नुकसान झालं नसल्यास घरमालकानंच रंगकाम करणं योग्य मानलं जातं.




