शिवरक्षक करिअर अकॅडमीचा चालक योद्धा राजे पवार यांच्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणार्या एका २१ वर्षीय तरुणीचा अकॅडमी चालकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे.
शिवरक्षक करिअर अकॅडमीचा चालक योद्धा राजे पवार याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील बोरखेड येथील रहिवासी असलेली २१ वर्षीय विद्यार्थिनी अहिल्यानगरमधील शिवरक्षक करिअर अकॅडमीमध्ये पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होती. ती याच संस्थेच्या वसतिगृहात वास्तव्यास होती. दरम्यान, १७ जुलै ते ३ सप्टेंबर या कालावधीत संशयित आरोपी योद्धा राजे पवार याने तरुणीला कार्यालयात बोलावून तिच्याशी गैरवर्तन केले.
त्याने तिच्या अंगावर हात टाकून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली. घाबरलेल्या तरुणीने सुरुवातीला नेकनूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर ही तक्रार तोफखाना पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी योद्धा पवार याच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे करत आहेत.




