ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांसह ९ अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई, तडकाफडकी केलं निलंबन..

माढा ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेकडून वॉर्ड आणि स्वच्छतागृहाची साफसफाई करून घेतल्याच्या धक्कादायक प्रकरणात अखेर आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल १४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास मेमाणे यांच्यासह एकूण ९ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे आरोग्य विभागात आणि परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण एप्रिल २०२५ मध्ये समोर आले होते. माढा तालुक्यातील खैराव येथील हेमा धडे (वय ३०) या प्रसूतीसाठी १ एप्रिल रोजी माढा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्याच रात्री त्यांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली.

प्रसूतीनंतर उपचारासाठी त्या रुग्णालयात दाखल असतानाच त्यांच्याकडून आणि त्यांच्या पतीकडून वॉर्ड तसेच स्वच्छतागृहाची साफसफाई करून घेतल्याचा आरोप झाला होता.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला होता.

प्रसूतीनंतर विश्रांतीची गरज असलेल्या महिलेकडून अशी कामे करून घेणे हे अत्यंत अमानवीय आहे. सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.

घटनेनंतर आरोग्य विभागाने चौकशी सुरू केली होती. चौकशी अहवालाच्या आधारे संबंधित कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.

निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये डॉ. विलास मेमाणे, दिव्या गवळी, स्मिता जमदाडे, चंद्रकांत गोवर, सौदागर जाधव, सत्यजीत राठोड, शुभम डाकूलवार, भरत कोटीवाना आणि स्वप्नील जाधव यांचा समावेश आहे.

दरम्यान, या कारवाईचे स्वागत करताना सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर कारवाईसाठी तब्बल 14 महिने का लागले, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दोषींवर कारवाई झाली असली तरी विलंबामागील कारणे समोर येणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे ग्रामीण रुग्णालयांतील व्यवस्थापन, रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पुढील चौकशीत आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे