ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

शिर्डीतील रामनवमी उत्सवावर युद्धाचे सावट-गॅस व इंधन टंचाई तसेच विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा व उष्णतेच्या तीव्रतेमुळे भाविकांची संख्या मंदावली

अहिल्यानगर

युद्धामुळे निर्माण झालेली गॅस  व इंधन टंचाई तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या वार्षिक परीक्षा व उष्णतेची तीव्रता यामुळे यंदाच्या रामनवमी उत्सवावर या गोष्टींचे सावट दिसून आले. त्यामुळे भाविकांची संख्या मंदावली असल्याचे दिसून आले. असे असले तरी गुरुवारी रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले. मुंबईसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी  दुमदुमून गेली होती.

इराण , इस्त्राईल व अमेरिका  या देशात सध्या युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे गॅस व इंधन टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना गॅस व इंधन टंचाईचा सध्या मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. वाहनांना पुरेसे इंधन मिळत नसल्यामुळे तसेच हॉटेल चालकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या सध्या सुरू असलेल्या वार्षिक परीक्षा व उष्णतेची तीव्रता या गोष्टींची शिर्डी  रामनवमी उत्सवावर सजावट निर्माण झाल्याचे दिसून आले. उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे श्रींची काकड आरती झाली. काकड आरतीनंतर साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांनी विणा, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व वैद्यकिय संचालक डॉ. शैलेश ओक यांनी फोटो घेवून सहभाग घेतला. यावेळी प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी कावडी मिरवणूक  झाली व श्रींचे मंगलस्नान होऊन दर्शन सुरु झाले. रामनवमी उत्सवाच्या निमित्त मान्यवरांच्या हस्ते पाद्यपूजा व साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज व द्वारकामाईतील गव्हाचे पोते बदलण्यात आले.

सकाळी मारुती मंदिराशेजारील साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर विक्रम नांदेडकर, गोरटे यांचे श्रीराम जन्मोत्सव कीर्तन झाले. त्यानंतर श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी तुकाराम दैठणकर प्रस्तुत शेहनाई म्युझिकल इव्हेंट यांचा भक्तीगीत, अभंग वाणी, शास्त्रीय संगीत व जागृत कोहली आग्रा यांचा साईभजन कार्यक्रम झाला.

दुपारी निशाणाची मिरवणूक  तर सायंकाळी साईबाबांच्या पादुकांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, साईभक्त, ग्रामस्थ आणि बँड पथके मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मिरवणूक परत आल्यानंतर श्रींची धुपारती व फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त संगीतकार आनंद मिलींद यांचा साईभजन संध्या कार्यक्रम झाला.

रात्री श्रींच्या समोर इच्छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम झाला. गुरुवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्रींचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनाकरीता खुले ठेवण्यात आले होते.

उत्सवाच्या सांगता दिनी आज शुक्रवारी पहाटे श्रींचे मंगलस्नान व पाद्यपुजा नंतर गुरुस्थान मंदिर येथे रुद्राभिषेक, सकाळी विक्रम नांदेडकर, गोरटे यांचे काल्याचे कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम तर दुपारी श्रींची माध्यान्ह आरती नंतर कला सौरभ संस्था मुंबई पद्मनाथ ससिहिललू यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व पुष्पांजली संगीत नाट्य अ‍ॅकेडमी, बैंगलोर विद्वान कोलारा रमेश यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून सायंकाळी विजय साखरकर मुंबई यांचा सरोज प्रस्तुत साईस्वर नृत्योत्सव कार्यक्रम होणार आहे.

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे