
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली. तीन तरुणांनी सदावर्ते यांच्या घराच्या खाली येऊन ही तोडफोड केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे काय? असा सवाल करतानाच मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
माझ्या घरासमोर येऊन काही लोकांनी रेकी केली होती. एका चॅनलने हे दाखवलं. हे षडयंत्र आहे. मी थांबणार नाही. मी विद्यापीठ आणि कॉलेजात जाऊन गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. माझं सकारला म्हणणं आहे, एकट्या जरांगेंचं ऐकू नका. आमचंही ऐका. जरांगेचे लाड थांबवले नाही तर मीही प्राणांतिक उपोषण करेल. पाणी घेऊन उपोषण होत नाही. सलाईन लावून उपोषण होत नाही, असा टोलाही त्यांनी जरांगे पाटील यांना लगावला.
या प्रकरणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.