
सरकारी नोकरी मधील खासगीकरण थांबवून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी देशभरातील कर्मचाऱ्यांनी दिल्लीत १ ऑक्टोबरला आंदोलन केले.
या आंदोलनात नगर जिल्ह्यातील दीड हजार कर्मचाऱ्यांनी शंखनाद आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनानंतर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
जिल्ह्यातून जिल्हा परिषद मुख्यालयातील ५५ कर्मचाऱ्यांसह जिल्हाभरातील शिक्षक, ग्रामसेवकांसह इतर दीड हजार कर्मचारी दिल्लीला रवाना झाले होते. १ ऑक्टोबरला दिल्लीत हे आंदोलन करण्यात आले. राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष सुभाष कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद मुख्यालयातील ५५ कर्मचारी दिल्लीला गेले आहेत.
याशिवाय इतर विभागांचे सुमारे दोन हजार कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले, अशी माहिती जि. प. कर्मचारी संघटनेने दिली. दिल्लीत आंदोलनावेळी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष अभय गट, मनोज चोभे, संदीप वाघमारे, विकास साळुंखे, सुरज भोजने, आरती शेकडे, कल्पना शिंदे, अनघा कुलकर्णी आदी उपस्थित होते.