सारसनगरमध्ये उभारली 3.2 कोटींची ‘अशी’ भव्य यंत्रणा, 30 हजार घरांचा अंधार मिटणार…
अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील वाढती वीज मागणी आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी महावितरणच्या वतीने सारसनगर येथे ३३/११ के.व्ही. व १० एमव्हीए क्षमतेचे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात आले असून, ते येत्या महिनाभरात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे.
केंद्र शासनाच्या एमएसकेव्हीवाय २.० आणि आरडीएसएस योजनेअंतर्गत सुमारे ३ कोटी २० लाख रुपये खर्च करून हे उपकेंद्र उभारले गेले असून, संबंधित भागांना वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्यांची कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, नवीन निवासी वसाहती आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे विद्युत भवन उपकेंद्रावर अतिरिक्त भार पडून उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होते.
या समस्येचे निराकरण करून वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी आणि विद्युत भवन उपकेंद्रावरील ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
हे उपकेंद्र सुरू झाल्यानंतर मार्केट यार्ड, सारसनगर, बुरुडगाव रोड, पुणे एसटी स्टँड आणि नगर कॉलेज परिसरातील सुमारे ३० हजार वीज ग्राहकांना योग्य व्होल्टेजसह अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे.




