माजी नगरसेवक आणि साथीदारांचा हॉटेल व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला..
अहिल्यानगर

अहिल्यानगरमधील माळीवाडा परिसरातील हॉटेल व्यावसायिक दिनेश खरपुडे यांच्यावर १९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास कोठला स्टँडजवळील मच्छी मार्केट परिसरात जीवघेणा हल्ला झाला.
खरपुडे जेवण करून वंजार गल्लीकडे जात असताना, ‘मेंबरसोबत राहतो म्हणून तू माजला का’ असा जाब विचारत माजी नगरसेवक सचिन जाधव आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना अडवून शिवीगाळ केली. याला विरोध करताच सचिन जाधव यांनी दुचाकीच्या डिक्कीतून चॉपरसारखे धारदार शस्त्र काढून वार केला, ज्यात बचाव करताना खरपुडे यांच्या डाव्या मनगटावर खोलवर जखम झाली.
ते खाली कोसळल्यानंतर सचिन राऊत उर्फ नफऱ्या, नितीन सुरसे आणि बंटी उर्फ स्वप्निल बेंद्रे यांनी दगड, विटा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि सचिन जाधव यांनी जीवे मारण्याची धमकी दिली.
आरडाओरडा ऐकून मित्रांनी त्यांची सुटका करत रुग्णालयात दाखल केले. जखमींच्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




