ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित महिला पत्रकार संमेलन २०२६ नव्या तंत्रज्ञानाचे भान ठेवा, काळाच्या मागे राहू नका – सुप्रिया सुळे

मुंबई

AI च्या मदतीने काही सेकंदामध्ये माहितीचे विश्व तुमच्यासमोर उलगडतं, त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचे भान ठेऊन काळाच्या पुढे वाटचाल करावी, असे आवाहन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केले.

त्या यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित महिला पत्रकार संमेलन २०२६ च्या उद्घाटन सत्रात बोलत होत्या. पत्रकारितेच्या क्षेत्रातील महिलांचे योगदान, त्यांचे अनुभव, आव्हाने आणि बदलत्या माध्यमविश्वातील त्यांची भूमिका यावर चर्चा घडवून आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे ‘महिला पत्रकार संमेलन २०२६’ आयोजित करण्यात आले होते.

संमेलनाच्या उद्घाटन सत्रात सुप्रिया सुळे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा निर्मला सामंत-प्रभावळकर, क्वेश्चन ऑफ सिटीच्या संस्थापक संपादक स्मृती कोप्पिकर, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, सेंटरचे कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ आदींची उपस्थिती होती. संमेलनात ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविकामध्ये सुप्रिया सुळे यांनी आज AI च्या मदतीने काही सेकंदांमध्ये मोठ्या प्रमाणावर डेटा मिळवता येतो. एखाद्या निवडणुकीमध्ये कोणत्या गटाला किती मतं मिळाली, त्याचं विश्लेषण किती टक्क्यांमध्ये झालं, अशी माहिती काही क्षणांत उपलब्ध होऊ शकते, असे सांगितले.

भावी पत्रकारांना उद्देशून त्यांनी वर्तमानपत्रं वाचणारी माझी पिढी एक दिवस थांबेल, पण तुमची पिढी तिथेच थांबता कामा नये. तुम्हाला स्वतःला दर दोन-तीन वर्षांनी नवीन तंत्रज्ञान शिकावं लागेल. स्वतःची कौशल्यं विकसित करावी लागतील अन्यथा काळाच्या मागे पडाल. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि त्याचा गैरवापर या दोन्ही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे.

पत्रकारिता हा अत्यंत जबाबदारीचा व्यवसाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे. महाराष्ट्राला आणि भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायला हवं.

आपण संविधानाच्या चौकटीत राहून, त्यातील मूल्यांचा आदर करून काम केलं पाहिजे. नैतिकता आणि जबाबदारी या पत्रकारितेच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही सर्वांनी तुमच्या कामातून स्वतःची ओळख निर्माण करा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी ‘राजसत्तेतल्या कारभारणी’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. अंकाच्या अतिथी संपादक निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी अंकांतील लेखांबद्दल माहिती दिली. ‘क्वेश्चन ऑफ सिटीज’च्या संस्थापक संपादक स्मृती कोप्पिकर यांनी अशा प्रकारच्या संमेलनातून ‘महिला’ या शब्दावर विशेष भर देणं योग्य असल्याचं मत व्यक्त केलं. पूर्वी महिला पत्रकारांना ठरावीक क्षेत्रांतील बातम्यांपुरतं मर्यादित ठेवलं जायचं. पण आज महिला पत्रकारांनी मोठा पल्ला गाठला आहे. तसेच, महिला पत्रकारांना मासिक पाळीदरम्यान रजा मिळावी, असं मत ही त्यांनी व्यक्त केलं. समाजातील विविध घडामोडींच्या कथा मांडणं आणि त्यांचा दस्तऐवज तयार करणं, ही पत्रकारितेची महत्त्वाची भूमिका आहे. शंभर वर्षांपूर्वी पत्रकारितेचं जे महत्त्व होतं, ते आजही कायम आहे. यावेळी त्यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवरही भाष्य केलं.

एमजीएम विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांनी उद्घाटनिय समारोप केला. महाराष्ट्र टाइम्सच्या डेप्युटी न्यूज एडिटर प्रगती बाणखेले यांनी संवादक म्हणून भूमिका बजावली.

तसेच संमेलनात ‘अँकरिंग – अनुभव, आव्हाने व बदलते स्वरूप’ या विषयावर दुसरे सत्र झाले. या सत्रात न्यूज 18 ग्रुपच्या अँकर फराह खान, एनडीटीव्ही मराठीच्या अँकर वैष्णवी राऊत आणि मुंबई तक वृत्त वहिनीच्या अँकर अनुजा धाक्रस यांचा सहभाग होता. ‘बाईमाणूस’च्या पत्रकार संजना खंडारे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

तिसऱ्या सत्रात ‘संपादकीय विश्वातील महिला नेतृत्व’ या विषयावर चर्चा झाली. यावेळी सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार, दिव्य मराठीच्या निवासी संपादक दीप्ती राऊत, नवभारत आणि नवराष्ट्र डिजीटलच्या संपादक प्रतिभा चंद्रन यांनी आपले अनुभव मांडले. महाराष्ट्र टाइम्सच्या अनुजा चवाथे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज या चौथ्या सत्रात रेणुका कल्पना, अश्विनी सताव-डोके, स्वप्नाली सपकाळे यांनी फ्री-लान्सिंग पत्रकारिता करताना त्यांना येत असलेले बरे-वाईट अनुभव, भेडसावणाऱ्या समस्या यांचा उहापोह केला. ईंडी जर्नलच्या प्राजक्ता जोशी यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

पाचवे सत्र ‘दुष्काळाच्या झळा’ या विषयावर झाले. मराठवाड्यातील सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सकाळ मीडिया ग्रुपच्या दीपा कदम यांनी वरिष्ठ पत्रकार सुहास सरदेशमुख आणि स्तंभलेखिका कविता अय्यर यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देताना, जलयुक्त शिवार या योजनेवर भाष्य करीत, मराठवाडा नव्हे तर टॅँकरवाडा आहे अशी उपरोधीत टिपण्णी केली.

या भागात मोठ्याप्रमाणावर कापसाची शेती होत असल्यामुळे मराठवाड्यात सूतगिरण्या उभारण्याची गरज असल्याचे आग्रही मत त्यांनी मांडले. कविता यांनी ऊसावर मराठवाड्याचे अर्थकारण चालते आणि ऊसतोडीमुळे तेथे लोकांना रोजगार मिळतो, दुष्काळ निवारणाचा भाग म्हणून बहु-क्षेत्रीय लेखापरीक्षण झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

शेवटच्या समारोपीय सत्रामध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ सहाय्यक संपादक अलका धुपकर यांनी दिवसभर पार पडलेल्या सत्रांचा आढावा घेतला.

चव्हाण सेंटरचे महिला विभाग प्रमुख, प्रशांत ईखार यांनी परिश्रमपूर्वक या संमेलनाचे आयोजन केले.

महिला पत्रकारितेचा प्रवास, नेतृत्वाच्या संधी, माध्यमांमधील बदलते स्वरूप आणि महिलांसमोरील व्यावसायिक आव्हाने यांना या संमेलनाद्वारे व्यासपीठ मिळाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे