अहिल्यानगरमधील बोल्हेगाव येथील ३४ वर्षीय तरुण प्रसाद रतिलाल भंडारी यांचा मृत्यू..

अहिल्यानगरमधील बोल्हेगाव येथील ३४ वर्षीय तरुण प्रसाद रतिलाल भंडारी यांचा २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास नेवासा फाटा येथे विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
फ्लेक्स बोर्ड लावण्याचे काम करणारे प्रसाद आपल्या दोन सहकाऱ्यांसह एका तीन मजली इमारतीच्या टेरेसवर बोर्ड लावण्यासाठी गेले होते. सहकारी खाली गेल्यानंतर प्रसाद तेथे बोर्ड व्यवस्थित बसवत असताना अचानक आलेल्या वाऱ्याच्या झुळुकीमुळे फ्लेक्स बोर्डचा इमारतीजवळून गेलेल्या महावितरणच्या उच्च दाब वीज वाहिनीला स्पर्श झाला. बोर्ड हातात असल्याने प्रसाद यांना जोरदार विजेचा शॉक बसला आणि ते खाली कोसळले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नेवासा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री नालेगाव अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.




