ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

यशवंतराव चव्हाण सेंटर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बुवाबाजीविरोधी महिला राज्य परिषदेचे यशस्वी आयोजन

मुंबई

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २४ नोव्हेंबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘बुवाबाजीविरोधी महिला राज्य परिषद २०२६’ आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून सुमारे ६०० महिला प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने ही परिषद उत्साहात पार पडली. परिषदेच्या माध्यमातून बुवाबाजी, अंधश्रद्धा, महिलांचे शोषण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार या महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन करण्यात आले.

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रख्यात कवयित्री नीरजा म्हणाल्या की, धर्माच्या राजकारणामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत समाजपरिवर्तनाची महत्त्वाची जबाबदारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे होते.

परिषदेचे उद्घाटन अनोख्या प्रतीकात्मक पद्धतीने करण्यात आले. उद्घाटक नीरजा आणि अन्य मान्यवरांनी अंधश्रद्धेच्या पिंजऱ्यात अडकलेल्या भारतीय महिलेची पिंजऱ्याच्या एकेक कड्या सोडवून मुक्तता केली.

त्याच कड्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या कड्या बनून भोंदूबुवाच्या समोर पडतात आणि त्याला तुरुंगात जावे लागते, अशी या संकल्पनेमागील भूमिका होती.

नीरजा पुढे म्हणाल्या की, १९६०-७० च्या दशकात माणसे अधिक चौकस होती. चंद्रावर माणूस गेल्यानंतर संकष्टीचा उपवास सोडून देणाऱ्या वृद्धा अस्तित्वात होत्या.

मात्र, आता प्रश्न विचारणे अवघड झाले असून भोंदूबुवा-बाबांकडे जाणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत आहे. महिलांनी कर्मकांड आणि दैववादावर विश्वास न ठेवता मन, मेंदू आणि मनगटाच्या जोरावर समाजात वावरावे आणि महाराष्ट्राचे पुरोगामित्व जपावे.

उद्घाटन सत्राच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण सेंटरच्या विविध उपक्रमांची आणि त्यातून साध्य झालेल्या कामाची माहिती देणारी लघुपटिका उपस्थितांना दाखवण्यात आली.

समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी अध्यक्षीय मनोगतात भोंदूबुवांकडून उच्चशिक्षित व्यक्तींचीही फसवणूक होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. महिला आणि युवतींनी हा लढा व्यापक करून शोषणमुक्त आणि समतायुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

समितीचे उपाध्यक्ष शामराव पाटील यांना डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी.लिट. पदवी प्रदान करण्यात येत असल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी अंधश्रद्धेविरोधातील कार्याचे कौतुक केले.

अंकशास्त्रासारख्या छद्मविज्ञानावर टीका करताना त्यांनी सोशल मीडियावर अंधश्रद्धेविरोधात भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींना होणाऱ्या ट्रोलिंगकडेही लक्ष वेधले.

या सत्राचे सूत्रसंचालन आरती नाईक यांनी केले. प्रियंका सवाखंडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह ॲड. रंजना गवांदे यांनी प्रास्ताविक केले, तर महिला सहभाग विभागाच्या राज्य कार्यवाह गायत्री आडे यांनी आभार मानले.

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ‘बुवाबाजी’ – बळी स्त्रियांचा, एक मानसशास्त्रीय विश्लेषण’ या विषयावर ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर आणि डॉ. अनिल डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. महिलांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन भोंदूबाबांकडून होणाऱ्या शोषणाचे त्यांनी विश्लेषण केले.

महिलांनी मनुस्मृतीने लादलेल्या अन्यायकारक बेड्या तोडून विवेक आणि तर्काच्या आधारावर वाटचाल करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. पीडितांच्या पुनर्वसनासाठी समितीने सक्रियपणे कार्यरत राहण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. या सत्राचे सूत्रसंचालन कविता मते यांनी केले.

तिसऱ्या सत्रात ‘जेन-झी टॉक ऑन बुवाबाजी’ या परिसंवादात प्रियांका खेडेकर, हरी आवळे, शीतल वसावे आणि गौरी जाधव यांनी तरुणाईच्या दृष्टिकोनातून आपली मते मांडली.

महिलांना अपमानित करणारी डाकीण प्रथा, ऑनलाइन माध्यमांतून होणारी फसवणूक आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे होणारे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण या विषयांवर चर्चा झाली. या परिसंवादाचे प्रास्ताविक यश सूर्यवंशी यांनी केले, तर इरा बालगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

परिषदेच्या समारोप सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते यांनी चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अंधश्रद्धाविषयक आशयाबाबत कलाकार आणि प्रेक्षक या दोघांनीही सजग राहण्याची गरज व्यक्त केली. महिलांनी असुरक्षितता, अस्वस्थता आणि भय यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून मुकाबला करावा तसेच पुरुषप्रधान मानसिकता बदलून समानतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे त्या म्हणाल्या. समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांनी राज्यभर राबवण्यात येत असलेल्या बुवाबाजीविरोधी अभियानाचा आढावा घेतला. या सत्राचे सूत्रसंचालन रुक्साना मुल्ला यांनी केले, तर यशवंतराव चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी आभार मानले.

समारोप सत्रात सहा ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची नियमावली तयार करणे, केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी जादूटोणाविरोधी कायदा लागू करणे आणि २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा खर्च कमी करून उर्वरित निधी दुष्काळ निवारणासाठी वापरणे, या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. ‘हम होंगे कामयाब’ या गीताने परिषदेची सांगता झाली.

या राज्यस्तरीय परिषदेच्या आयोजनात यशवंतराव चव्हाण सेंटरने महत्त्वाची भूमिका बजावली. सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक श्री. दत्ता बाळसराफ, महिला विभागाचे प्रमुख प्रशांत ईखार, शिक्षण विभागाचे प्रमुख योगेश कुदळे, तसेच सेंटरच्या मिनल सावंत, वंदना वाळिंजकर, सुकेशनी मर्चंडे आणि मनीषा खिल्लारे यांनी आयोजन व व्यवस्थापनासाठी विशेष योगदान दिले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य व मुंबई शाखेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे परिषदेचे यशस्वी आयोजन शक्य झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे