
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निवृत्त एअर मार्शल(निवृत्त) जितेंद्र मिश्रा यांनी आपल्या प्रशासकीय पथकासह सोमवारी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानला भेट दिली.
साईबाबा संस्थानच्या पारदर्शक आर्थिक व्यवस्थापनाचा आणि भाविकांसाठी राबवल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांचा सखोल अभ्यास करण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
या भेटीदरम्यान साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी पथकाचे स्वागत करून त्यांना संस्थानच्या धार्मिक, सामाजिक व प्रशासकीय कामकाजाची माहिती दिली. या पथकाने देणगी मोजणी केंद्र, सोने-चांदी ठेवल्या जाणाऱ्या स्ट्राँग रूमची प्रत्यक्ष पाहणी करून देणगी पेटी उघडणे, सील करणे व बँक कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या पैशांच्या मोजदाद प्रक्रियेचा सूक्ष्म अभ्यास केला.
तसेच, दररोज लाखो भाविकांसाठी असलेली दर्शन व्यवस्था, भक्तनिवास, प्रसादालय, आरोग्य सेवा, सुरक्षा आणि स्वच्छतेची पाहणी करून अयोध्या पथकाने साई संस्थानच्या सुसूत्र कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत तोंडभरून कौतुक केले.




