साई सेवा पतसंस्था घोटाळ्यात प्रसिद्ध रामकथाकार महाराजांचे नाव चर्चेत ठेवीदारांच्या कोट्यावधींच्या पैशांवर कोणी मारला डल्ला..
अहिल्यानगर

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील साई सेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्याने ठेवीदार आक्रमक झाले असून, कृती समितीने येत्या २६ नोव्हेंबर रोजी पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयासमोर सामूहिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयाने १६ नोव्हेंबरपर्यंत विशेष लेखापरीक्षण पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे यापूर्वीचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते, मात्र मुदत संपूनही लेखापरीक्षण पूर्ण न झाल्याने ठेवीदारांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
सन २०१७ ते २०२५ या कालावधीत संस्थेतील आर्थिक गैरव्यवहार, कर्जवाटप, निधीचा वापर आणि तत्कालीन चेअरमन, व्यवस्थापक, संचालक मंडळ व सनदी लेखापरीक्षकांच्या भूमिकेची सखोल तपासणी करून आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, व्यवस्थापकाच्या संबंधित कंपनीतील एका प्रसिद्ध रामकथाकार महाराजांच्या संचालकपदाच्या संबंधांची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करून ठेवीदारांचे कष्टाचे पैसे परत मिळवून द्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण छेडले जाणार आहे.




