ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

आमिषाच्या जाळ्यात हजारो गुंतवणूकदार…

अहिल्यानगर

शेवगाव तालुक्यातील कथित शेअर मार्केट घोटाळ्याने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली होती. जादा परतावा मिळेल, या आमिषाने शेवगावसह पाथर्डी, नेवासा आणि लगतच्या पैठण परिसरातील अनेक नागरिकांनी आपली पुंजी गुंतवली.

काहींनी व्याजाने पैसे उचलले, तर काहींनी जमिनी विकून गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेटमधील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण पुढे आले. त्यानंतर आता श्री संत माऊली मल्टिस्टेट (तिसगाव अर्बन) आणि अमरापूर येथील सुवर्णबिंदू अर्बन निधी लिमिटेड तसेच पाथर्डी येथील सुवर्णबिंदू फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्याशी संबंधित आर्थिक फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत.

एकामागून एक आर्थिक फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असल्याने हजारो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले असून अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

अहिल्यानगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात विविध पतसंस्था, मल्टिस्टेट संस्था आणि अन्य आर्थिक संस्था कार्यरत आहेत. मात्र, गेल्या काही काळात काही संस्थांमधील गैरव्यवहार आणि आर्थिक फसवणुकीची प्रकरणे पुढे येत असल्याने ठेवीदार आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

आकर्षक योजना, जादा परतावा आणि कमी कालावधीत पैसे दुप्पट करण्याच्या आश्वासनांना भुलून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात असल्याचे या प्रकरणांतून दिसून येत आहे. शेवगाव तालुक्यातील कथित शेअर मार्केट घोटाळ्याची चर्चा जिल्हाभर झाली होती.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळेल, असे सांगून विविध कंपन्या व योजनांच्या माध्यमातून नागरिकांकडून पैसे स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे.

शेवगावसह पाथर्डी, नेवासा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण परिसरातील अनेक नागरिकांनी त्यात पैसे गुंतवले.

या गुंतवणुकीसाठी काहींनी कर्ज काढले, तर काहींनी व्याजाने पैसे घेतले. काही गुंतवणूकदारांनी जमीन विकून पैसे गुंतवल्याची माहिती आहे. शेअर मार्केट प्रकरणाचा तपास सुरू असतानाच श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेटमधील आर्थिक फसवणुकीचे प्रकरण चर्चेत आले. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील मयुर वैद्य याने ही संस्था स्थापन केल्याची माहिती आहे.

अल्पावधीत या संस्थेने विविध ठिकाणी शाखा सुरू करून आपला विस्तार केला. या संस्थेच्या माध्यमातून ठेवीदारांना चुकीची माहिती देणे, आश्वासने देणे आणि जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या रकमा परत न मिळाल्याने फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. सुरूवातीला श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

त्यानंतर शेवगाव, पाथर्डी आणि अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल झाले. या प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून आतापर्यंत एका संशयित आरोपीला अटक केली आहे.

‘मल्टिस्टेट’च्या नावाखाली निधी कंपन्यांचा व्यवहार ?

श्री संत माऊली मल्टिस्टेट, तिसगाव अर्बन अशा नावाने असलेल्या संस्थेबाबत माहिती घेतली असता संबंधित संस्था प्रत्यक्षात मल्टिस्टेट नसून निधी लिमिटेड कंपन्यांच्या स्वरूपातील असल्याचा दावा करण्यात येत आहे. तिसगाव अर्बननंतर श्री संत माऊली अशा नावाने संस्थेची ओळख निर्माण करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

निधी लिमिटेड कंपन्यांचे नोंदणीकरण पुणे येथील कंपनी निबंधक कार्यालयाकडे (आरओसी) केले जाते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना मल्टिस्टेट संस्थेप्रमाणे भासवून ठेवी स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष भेटी, कार्यालयातील संपर्क आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध योजना व परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून ठेवी स्वीकारण्यात आल्याचे सांगण्यात येते.

आता गुंतवणूकदारांना पैशांची प्रतीक्षा

शेवगाव, पाथर्डी आणि नेवासा परिसरात एकामागून एक आर्थिक फसवणुकीची प्रकरणे समोर येत असल्याने सर्वाधिक फटका सर्वसामान्य गुंतवणूकदारांना बसला आहे. जादा परताव्याच्या आशेने आयुष्यभराची पुंजी गुंतवणारे, कर्ज काढून पैसे देणारे आणि सोने तारण ठेवणारे नागरिक आता आपल्या पैशांच्या परतीची प्रतीक्षा करीत आहेत. विविध प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू असल्याने तपासातून नेमकी आर्थिक उलाढाल, गुंतवणूकदारांची संख्या, संस्थांची कायदेशीर रचना आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका किती आहे, हे स्पष्ट होणार आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे