गणेशोत्सवाच्या देखाव्यातून ‘मराठी शाळा’ जपण्याचा संदेश
सांताक्रुज,मुंबई..

शांतता विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अभिनव उपक्रम..
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर जनजागृती करण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, याची प्रचिती यंदा शांतता विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यातून येत आहे. यावर्षी मंडळाने ‘मराठी शाळा’ ही संकल्पना साकारत मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व, त्यांच्यासमोरील सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने याकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
मंडळाने उभारलेल्या देखाव्यात प्रवेशद्वारापासूनच मराठी शाळेचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
या छायाचित्रांखाली ‘उत्कर्षाची वाट दाखवणारी आणि समृद्धीचे स्वप्न मनात रुजवणारी मराठी शाळा’ हा संदेश देण्यात आला आहे.
शाळेच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या विविध दिग्गज मान्यवरांना स्थान देण्यात आले आहे. त्यातून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचे स्मरण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मुख्य देखाव्यात मराठी शाळेची प्रतिकृती साकारताना फळा, सुविचार, वर्गखोल्या, संगणक वर्ग तसेच मुख्याध्यापकांचे कार्यालय यांसारख्या बारकाव्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश केल्याचा अनुभव निर्माण होतो. पारंपरिक शाळेचे वातावरण आणि आधुनिक शिक्षणाची साधने यांचा मेळ या देखाव्यातून साधण्यात आला आहे.

या संकल्पनेमागील मुख्य उद्देश केवळ मराठी शाळेचे चित्रण करणे नसून, मराठी माध्यमाच्या शाळांची सद्यस्थिती, अनेक शाळा बंद होण्यामागील विविध कारणे आणि त्या पुन्हा सक्षमपणे कार्यरत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत समाजात विचारमंथन घडवून आणणे, हा आहे.

मराठी शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे माध्यम नसून भाषा, संस्कृती, संस्कार आणि सामाजिक जडणघडणीचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आधुनिक शिक्षणपद्धती, तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत त्यांना सक्षम करण्याची गरज या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नाला स्पर्श करणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी भेट देऊन मराठी शाळांच्या भवितव्याबाबत विचार करावा, तसेच या विषयावर सकारात्मक चर्चा घडून यावी, अशी अपेक्षा शांतता विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने व्यक्त केली आहे.
मयूर पालकर,
7768067187




