
अहिल्यानगर मधील सिएट टायर कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट दुकानात मॅनेजर म्हणून काम करताना कंपनीच्या मालकाचा विश्वासघात करून खोट्या क्रेडिट नोटा, बनावट बिले व स्टॉक स्टेटमेंटमध्ये फेरफार केल्याप्रकरणी मॅनेजरविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारात कंपनीची तब्बल 23 लाख 22 हजार 293 रूपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी अजय लक्ष्मीनारायण उपाध्याय (वय 31, रा. रोहन निथला, विमाननगर, पुणे) यांनी सोमवारी (14 सप्टेंबर) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष रसिकलाल गुंदेचा (रा. आनंदधामजवळ, मार्केट यार्ड, अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2025 ते 17 जुलै 2026 या कालावधीत संशयित आरोपी हा एमआयडीसी परिसरातील मुरली मनोहर ट्रेडींग कंपनीच्या सिएट कॉन्ट्रॅक्ट नावाच्या दुकानात मॅनेजर म्हणून कार्यरत होता.
या कालावधीत त्याने कंपनीच्या मालकाचा विश्वासघात करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेळोवेळी गैरप्रकार केल्याचा आरोप आहे.




