अहिल्यानगर मनपा कर्मचार्यावरील प्राणघातक हल्ला पूर्वनियोजित- मनपाचा वायरमन अटकेत

या प्रकरणी अक्षय मुळे (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे ई-स्मार्ट कंपनीत कार्यरत असून या कंपनीने महापालिकेच्या स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीचे काम घेतले आहे.
कंपनीत अक्षय बोरुडे हे सुपरवायझर, तर धीरज रजपूत व काव्या तावरे हे हेल्पर म्हणून काम करतात. फिर्यादीनुसार, 7 ऑगस्ट रोजी सकाळी महापालिकेचा वायरमन युनुस शेख याने अक्षय मुळे यांना फोन करून मुकुंदनगर येथे स्ट्रीट लाईटच्या कामासाठी तातडीने येण्यास सांगितले. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास कंट्रोल रूममध्ये आलेल्या तक्रारीनुसार मुळे, रजपूत, तावरे व अक्षय बोरुडे हे टेम्पोतून दर्गा दायरा परिसरात स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेले.
तेथे त्यांनी मेन पॅनलचे काम पूर्ण केले. त्यावेळी वायरमन शेख तेथे उपस्थित होता. त्याने दर्गा दायरा कब्रस्तान परिसरातील दोन-तीन स्ट्रीट लाईट बंद असल्याचे सांगून त्या दुरुस्त करण्यास सांगितले. त्यानुसार कंपनीचे कर्मचारी दर्गा दायरा परिसरात गेले.
बोरुडे हे स्ट्रीट लाईट तपासण्यासाठी बंगल्यावर चढले. काव्या तावरे व अक्षय बोरुडे हे मेन लाईट बंद करण्याबाबत फोनवरून बोलत असताना अचानक आरडाओरड झाल्याचा आवाज आला. फिर्यादीनुसार, काहीजण धीरज रजपूत यांना घेरून लाकडी बांबू व लोखंडी पाइपने मारहाण करीत होते. हल्लेखोरांकडून धीरज यांना उद्देशून इसको मार डालो असे म्हणत मारहाण करण्यात येत होती. हा प्रकार पाहून सहकार्यांनी आरडाओरड करून हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्यावर लाईट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलीवरून तसेच पायी पळून गेले. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या धीरज रजपूत यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापती झाल्या असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्तकिम अस्लम सय्यद यांच्यासह अन्य संशयितांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी महापालिकेचा वायरमन युनुस शेख याला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, या हल्ल्यामागे पूर्वनियोजित कट होता का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
भिंगार कॅम्प पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची पथके पसार आरोपींचा शोध घेत आहेत. हल्ल्याचे नेमके कारण तसेच या घटनेमागील इतर बाबींचा तपास सुरू आहे.




