भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार पिंगली व्यंकय्या यांचे जयंती निमित्त पुष्पांजली वाहून अभिवादन
सोलापूर

भारतीय तिरंग्याचे जनक पद्मशाली कुलभूषण स्व. पिंगली वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर येथील डॉ. प्रा. अजय दासरी यांच्या निवासस्थानी पिंगली व्यंकय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक पुष्पांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाच्या शिल्पकाराला विनम्र अभिवादन करत त्यांच्या राष्ट्रसेवेचे स्मरण केले.
यावेळी अशोक इंदापूरे व अॅड. श्रीनिवास क्यातम यांनी पद्मशाली समाजातील अशा थोर महापुरुषांचे आदर्श युवकापुढे ठेवले पाहिजे असे मनोगत व्यक्त करून पिंगली व्यंकय्या यांच्या राष्ट्रकार्यातील योगदानाचा गौरव केला व त्यांना भारतरत्न प्रदान करण्याच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला.
भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार, थोर स्वातंत्र्यसैनिक, कृषी संशोधक आणि पद्मशाली समाजाचे भूषण श्री. पिंगली व्यंकय्या यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान “भारतरत्न” मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, अशी मागणी पद्मशाली स्टुडंट्स असोसिएशन तसेच महाराष्ट्र तेलुगू महासंघाचे संस्थापक डॉ. प्रा. अजय दासरी यांनी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली.
डॉ. दासरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री. पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात राष्ट्रध्वजाची संकल्पना साकारून भारताला राष्ट्रीय अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि एकात्मतेचे अमूल्य प्रतीक दिले. आज प्रत्येक भारतीय अभिमानाने तिरंग्याला सलाम करतो. हा तिरंगा म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याचा, बलिदानाचा आणि अखंडतेचा सर्वोच्च मानबिंदू आहे. अशा महान राष्ट्रपुरुषाच्या कार्याचा गौरव देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने होणे ही राष्ट्राची नैतिक जबाबदारी आहे.
भारत सरकारने सन २००९ मध्ये त्यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव म्हणून पिंगली व्यंकय्या यांच्या छायाचित्रासह विशेष स्मारक टपाल तिकीट प्रकाशित केले. तसेच सन २०११ मध्ये त्यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार प्रदान करण्याचा प्रस्तावही विचाराधीन ठेवण्यात आला होता. मात्र, आजतागायत त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे २००९ पासून प्रलंबित असलेला हा प्रस्ताव मंजूर करून येत्या २६ जानेवारी २०२७ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पिंगली व्यंकय्या यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार जाहीर करावा, अशी आग्रही मागणी डॉ. दासरी यांनी केली.
देशभरात सुमारे पाच कोटींहून अधिक पद्मशाली (विणकर) समाज वास्तव्यास असून, या समाजासह सर्व राष्ट्रप्रेमी भारतीयांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास डॉ. प्रा. अजय दासरी, अशोक इंदापूरे, अॅड. श्रीनिवास क्यातम, यशवंत इंदापूरे, राजू येमुल, गोवर्धन कमटम, प्रा. व्यंकटेश रच्चा, प्रा. व्यंकटेश पडाल यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व पद्मशाली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. व्यंकटेश पडाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
डॉ. प्रा. अजय दासरी यांनी सांगितले की, पिंगली व्यंकय्या यांना मरणोत्तर “भारतरत्न” प्रदान करण्यासाठी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना सविस्तर निवेदन पाठविण्यात येणार असून, हा सन्मान मिळेपर्यंत देशभर जनजागृती करून हा लढा सातत्याने सुरू ठेवला जाईल. राष्ट्रध्वजाच्या शिल्पकाराला सर्वोच्च नागरी सन्मान मिळणे ही केवळ पद्मशाली समाजाची नव्हे, तर संपूर्ण देशाची भावना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




