पुण्यासह १० जिल्ह्यांत मुसळधार पाऊस हजेरी लावणार..

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सक्रिय असलेल्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात १० जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण त्यानंतर पुढील काही दिवसांत पावसाचा जोर पूर्णपणे ओसरून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. त्याशिवाय विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण आहे.
यात प्रामुख्याने यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.
उद्या विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी कायम राहील. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता आहे.
६ ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर पूर्णपणे कमी होणार आहे. ६ आणि ७ ऑगस्ट रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्येही पावसाची कोणतीही मोठी चेतावणी देण्यात आलेली नाही.
घाटमाथ्यावरील नागरिकांनी आज आणि उद्या बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी. तर ६ ऑगस्टनंतर पावसात मोठी विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
ज्या भागात पाऊस थांबेल तिथे शेतकऱ्यांना शेतीची रखडलेली कामे उरकून घेण्यास मदत होणार आहे. पावसाळा सुरू होऊन २ महिने उलटले आहेत, पण अद्याप अर्ध्या महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील उर्वरित भागात पावासाची शक्यता आहे.




