आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात अवतरली पंढरी… आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न
अहिल्यानगर

साधू-संतांच्या विचारांनी आणि वारकरी संप्रदायाने आपल्या महाराष्ट्राला कायमच सन्मार्ग दाखवला आहे. आषाढी एकादशीच्या भक्तिमय पर्वावर गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात श्री विठ्ठलाची महापूजा व माझे मार्गदर्शक, श्रद्धेय स्व. अरुणकाका जगताप यांच्या प्रतिमेचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात पूजन केले.

पुरोहितांच्या वेद मंत्रोच्चारात नगरसेविका शीतल ढोणे, अजय ढोणे व प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते विठ्ठलाची पाद्यपूजा पार पडली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी उपमहापौर गणेश भोसले, गुणे आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे सचिव डॉ. विजय भंडारी यांच्यासह महायुतीचे नगरसेवक, पदाधिकारी आणि नगरकर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या देशाला आणि महाराष्ट्राला कुठल्याही संकटाचा धक्का लागू नये; आपला बळीराजा, कष्टकरी, उद्योजक आणि विद्यार्थी वर्ग सुखाने नांदावा, तसेच आपल्या हिंदू धर्माची व संस्कृतीची विचारधारा अशीच अखंड पुढे जात राहो, हीच आज विठुरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.

आमचा जगताप परिवार गेल्या ६५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा हा समृद्ध वारसा जपत आला असून, आज चौथी पिढी पंढरीची वारी करत ही परंपरा पुढे नेण्याचे काम करत आहे. यंदाच्या आषाढीला काकांची उणीव भासत असली, तरी त्यांनी दिलेले संस्कार आणि विचार उराशी बाळगून हा आध्यात्मिक सोहळा आयोजित केला.

उपस्थित सर्व भाविकांसोबत महाआरती करून फराळाच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. सर्व वारकरी बंधू-भगिनींना व नगरकरांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!




