माजी नगरसेवक मनोज लक्ष्मण दुलम व त्यांच्या साथीदारां विरोधात गुन्हा दाखल..
अहिल्यानगर
सहकारी गृहनिर्माण संस्थेतील कथित कोट्यवधींच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड माजी नगरसेवक मनोज लक्ष्मण दुलम व त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप सभासदांनी केला आहे.
या निषेधार्थ पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासद कुटुंबासह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. पद्मपुरी गृहनिर्माण संस्थेच्या २२० सभासदांच्या निवाऱ्याच्या प्लॉटची बेकायदेशीर विक्री करण्याचा करार करून हजारो नागरिकांना बेघर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील सुमारे १ हेक्टर २० आर क्षेत्रफळाची, अंदाजे ७ कोटी ५० लाख रुपये किंमतीची जागा अवघ्या ४२ लाख ९० हजार रुपयांत विकण्याचा प्रयत्न करून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आल्याचे सभासदांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी दि. १९ जून २०२३ रोजी पद्मपुरी सोसायटीच्या सभासदांनी पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला होता. हा अर्ज कारवाईसाठी तोफखाना पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आला. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षकांकडे पुन्हा अर्ज देण्यात आला. त्यावेळी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असतानाही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
माजी नगरसेवक मनोज दुलम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने राजकीय दबावाखाली पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप सभासदांनी केला आहे.
विशेषतः गोरगरीब कष्टकरी विडी कामगार सभासदांच्या ४०० चौरस फुटांच्या प्लॉटचा बेकायदेशीर व्यवहार करून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.




