अहिल्यानगरच्या मतदार यादीत १ लाख ४० हजार ७६६ मृतांची नावे- ६१ हजार दुबार नावे, ‘एसआयआर’चे काम लवकरच पूर्णत्वाकडे
अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेमध्ये (एसआयआर) आत्तापर्यंत असंकलित मतदारांची संख्या ४ लाख २६ हजार ११३ आढळली आहे.
त्यामध्ये १ लाख ४० हजार ७६७ मतदार मयत, ६० हजार ८४१ मतदारांची नावे दुबार तर उर्वरित २ लाखावर मतदार हे कायमस्वरूपी स्थलांतरित झालेली आहेत किंवा त्यांचा बीएलओ व त्यांना मदत करणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना शोध लागलेला नाही.
अशा असंकलित मतदारांचे एकूण मतदारांशी असलेले प्रमाण १२.१८ टक्के इतके आहे तर नगर शहरात हेच प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २२ टक्के आहे. सर्वात कमी अकोल्यामध्ये ५.९३ टक्के प्रमाण असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण १२ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी नगर शहर, कर्जत -जामखेड, श्रीरामपूर, शिर्डी व कोपरगाव या पाच मतदारसंघाचे ‘एसआयआर’चे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे.
उर्वरित मतदारसंघांचे देखील ९८ टक्के पेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून लवकरच अहिल्यानगर जिल्ह्याचे शंभर टक्के काम पूर्ण होईल असा विश्वास गाढे यांनी व्यक्त केला. दरम्यान ‘एसआयआर’ मोहिमेला निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एसआयआर’चे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ३८ लाख १० हजार १०२ मतदार आहेत. त्यापैकी असंकलित मतदार संख्या ४ लाख २६ हजार ११३ इतकी आहे. अशा संकलित मतदारांची यादी प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकांनाही (बीएलए) त्या देण्यात आल्या आहेत.
या याद्यां संदर्भात राजकीय पक्षाच्या सहाय्यकांबरोबर बैठका घेण्याच्या सूचनाही बीएलओ यांना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राचे डिजिटायझेशनचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर मयत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या याद्या स्थानिक स्तरावर, तालुका पातळीवर व जिल्हा स्तरावरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
यासंदर्भात दावे, हरकती दाखल करण्यासाठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर ही सुधारित मुदत देण्यात आली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत असे दावे व हरकती निकली काढण्यासाठी मुदत असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.
राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मतदार यादीतील मतदारांच्या नावासमोर घर क्रमांकाचा तपशील अचूक दर्शवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेस मतदारांचे अचूक घर क्रमांक देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करताना किंवा नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करताना ज्या शाळेत असे मतदान केंद्र ठेवण्यात येईल त्या शाळांचे ‘यु-डायस कोड’ नमूद करण्याबाबत देखील राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाची कार्यवाही सुरू केल्याचे सुनील गाढे यांनी सांगितले.




