स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भव्य रक्तदान शिबिर, सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
अहिल्यानगर - "रक्तदानातून समाजसेवेची परंपरा अधिक बळकट करूया" – रवि दंडी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आनंद ऋषीजी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अहिल्यानगरचे आमदार श्री संग्रामभैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाने “स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त” भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री मार्कंडेय मंदिर देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिक व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.

कार्यक्रमास आनंदऋषीजी ब्लड बँकेचे सुनील महानोर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी रवि दंडी, सनी कांबळे, चैतन्य घुले, भैय्या घुले, महेंद्र कवडे, सागर शिंदे, शंकर जिंदम, मोहित गांधी, संग्राम रासकर, गौरव कचरे, अमित बिल्ला, अभिजीत येनगंदुल, प्रसाद चौधरी, रमेश केंजरला, चैतन्य सरगम, अमोल गाजेंगी, प्रवीण चौधरी, प्रथमेश दिकोंडा, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रवि दंडी म्हणाले, “स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम आयोजित करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळते. त्यामुळे प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे.”
पुढे बोलताना रवि दंडी म्हणाले, “समाजातील युवकांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्यातही पुढाकार घ्यावा. रक्तदान, आरोग्य शिबिरे आणि जनहिताचे उपक्रम सातत्याने राबविले तर समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. अशा उपक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच अग्रस्थानी राहील.”
आनंद ऋषीजी ब्लड बँकेचे सुनील महानोर यांनी रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “रुग्णालयांमध्ये अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया तसेच थॅलेसेमिया व गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी रक्ताची सातत्याने गरज भासत असते. एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणताही गैरसमज न बाळगता नियमित रक्तदान करावे.”
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करून त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. शिबिरात मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान करत समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आनंद ऋषीजी ब्लड बँकेच्या कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या केले. समाजहिताचा संदेश देणाऱ्या या रक्तदान शिबिराचे उपस्थित नागरिकांनी स्वागत केले असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




