
अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्य शासनाच्या निर्देशानुसार २ ऑक्टोबरपासून शहरात ‘सुधारणा उत्सव’ अभियान सुरू केले आहे.
सरकारी कार्यालयांमधील किचकट व लांबलचक प्रशासकीय प्रक्रियांमुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाया जातात व हीच अडचण दूर करण्यासाठी आणि सेवा सुटसुटीत व पारदर्शक करण्यासाठी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवले जात आहे. या मोहिमेत मनपा प्रशासन थेट नागरिकांकडूनच “काम कुठे अडते?” याच्या सूचना व अनुभव मागवणार आहे. नागरिकांच्या थेट अनुभवांवर आधारित आलेल्या या सूचनांचे वर्गीकरण, छाननी आणि पडताळणी तीन टप्प्यांत केली जाईल. बांधकाम परवानगी, विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि नाहरकत प्रमाणपत्र (NOC) देताना नेमकी कोणती कागदपत्रे अनावश्यक आहेत. आणि मंजुरीचे टप्पे कुठे कमी करता येतील, याची काटेकोर तपासणी केली जाणार आहे.
जे प्रस्ताव प्रशासकीयदृष्ट्या व्यवहार्य असतील, त्यांची तातडीने अंमलबजावणी करून प्रशासकीय प्रक्रियेत बदल केला जाईल. लवकरच मनपाकडून एक जाहीर पत्रक काढून अधिकृत सूचना स्वीकारल्या जातील.
अनावश्यक कागदपत्रांची छाननी आणि फेरबदल केल्यामुळे महापालिकेचे कामकाज अधिक गतिमान होईल, तसेच शासकीय व्यवस्थेतील हेलपाटे पूर्णपणे थांबून नागरिकांना जलद सेवा मिळण्यास मदत होणार आहे.




