राज्यातील शाळांमध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय…शाळांमध्ये राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यगीत

राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी करताना राज्यातील शाळांमध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीला हा पाठ्यक्रम लागू करण्यात येईल.
तसेच, राज्यातील शिक्षकांना नव्या पाठ्यक्रमाची माहिती देऊन, त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण करण्यात येईल. ‘सीबीएसई’प्रमाणेच शाळांचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याबाबतही चाचपणीही करण्यात येत आहे,’ अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुण्यात दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या(HSC) परीक्षांचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर होईल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा चांगल्या पद्धतीने विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध सोयीसुविधा मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील एका शाळेवर माझ्यासह शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी विशेष लक्ष देतील. ही शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्यात येईल. त्यानंतर या शाळेचा फायदा परिसरातील इतर शाळांना होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यगीत गाण्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच, सर्व शाळांनी मराठी विषय शिकवणे अनिवार्य आहे,’ असे दादा भुसे यांनी सांगितले.