महानगरपालिकेने नवीन बांधकाम परवान्यासोबत (Rain Water Harvesting) पाणी साठा बंधनकारक करावी – तुलसीराम पालीवाल
अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरात 1 लाख 30 हजारांपेक्षा जास्त नोंदणीकृत मालमत्ता आहेत. जर या सर्व मालमत्तांवर पावसाचे पाणी साठवणूक सक्तीने राबवली तर दरवर्षी कोट्यवधी लिटर पाणी जमिनीत मुरवता येईल.
त्यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठा वाढेल आणि शहरातील बोअरवेलची पाणी पातळी टिकून राहण्यास मदत होईल. व बोअरवेल च्या पाण्यामधील क्षार कमी होईल या करिता महानगरपालिकेने नवीन बांधकाम परवान्यासोबत (Rain Water Harvesting) पाणी साठा बंधनकारक करावी अशी मागणी तुलसीराम पालीवाल वृक्ष प्राधिकरण सदस्य, अहिल्यानगर यांनी मा. आयुक्त, अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या कडे एका पत्रकान्वये केली आहे.
सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. सिमेंटमुळे पाणी जमिनीत मुरत नाही. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना वैयक्तिकरित्या रेन वॉटर हार्वेस्टिंग तांत्रिकदृष्ट्या कठीण आणि खर्चिक होते.
तसेच अनेक नवीन बांधकामांमध्ये नियम असूनही RWH बसवले जात नाही.म्हणून नवीन बांधकाम परवाना देताना नियमानुसार “रेन वॉटर हार्वेस्टिंग उपाययोजना करणे बंधनकारक करावे. तसेच RWH ची प्रक्रिया पूर्ण न केल्यास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (Occupancy Certificate) देऊ नये. या सामाजिक विषयात कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करावी.
तसेच महानगरपालिका ज्या प्रकारे नवीन रस्त्याच्या कामात सांडपाणी चेंबर आणि नळ कनेक्शनचा खर्च करते, त्याच धर्तीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चरचा खर्चही महानगरपालिकेने करावा व सध्या सुरू असलेल्या रस्त्यालगतच्या सर्व मालमत्तांना रेन वॉटर हार्वेस्टिंग बसवण्याच्या नोटीस द्याव्यात.
शहरातील सर्व 1,30,000+ जुन्या मालमत्तांची 90 दिवसात तपासणी करून रेन वॉटर हार्वेस्टिंग नसल्यास दंडासह बसवणे बंधनकारक करावे, त्यासाठी अनुदान व जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी पालीवाल यांनी केली आहे.
तसेच पाणी ही मूलभूत गरज आहे. वेळीच कठोर निर्णय न घेतल्यास भविष्यात बोअरवेल पूर्णपणे कोरडे पडतील, त्या करिता या सामाजिक समस्या कायमची सुटण्या करिता योग्य ती कार्यवाही करावी अशीही मागणी तुलसीराम पालीवाल मा. आयुक्त यांच्या कडे केली आहे.




