ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

धीरज परदेशी मृत्यूनंतर महापालिका कर्मचार्‍यांचा बेमुदत संप, संपूर्ण शहरातील नागरी सुविधा बंद

अहिल्यानगर

मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरूस्तीसाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचार्‍यावर झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज रजपूत (परदेशी) यांचा रविवारी (दि. 9) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आ. संग्राम जगताप यांच्यासह आ. अक्षय कर्डिले, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि परदेशी कुटुंबीय आक्रमक झाले.

कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेसह पाईपलाईन, सावेडी, बोल्हेगाव फाटा भागात दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत व्यापार्‍यांनी दुकाने बंद केली.

दरम्यान, दुकाने बंद करण्याचे आवाहन करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकाव केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. बंद करण्यासाठी गेल्यानंतर दोन समाजाच्या गटांत किरकोळ बाचाबाची झाली. बंदचे आवाहन करणार्‍या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आ. जगताप आणि आ. कर्डिले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या पदाधिकार्‍यांनी माळीवाडा बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सायंकाळी आंदोलन केले. या वेळी धीरज परदेशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, धीरज परदेशी यांच्या पत्नीने केलेल्या मागण्यांनाही आ. जगताप यांनी पाठिंबा दिला आहे.

धीरज यांचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयात ‘इन-कॅमेरा’ करावे, ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच ठिकाणी अंत्यविधी करावा आणि आरोपींची अनधिकृत घरे प्रशासनाने तातडीने जमीनदोस्त करावीत, अशा मागण्या कुटुंबीयांनी केल्या आहेत.

दरम्यान, धीरज यांचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथे करण्याची मागणी पोलिसांनी मान्य करत मृतदेह सायंकाळी शवविच्छेदनासाठी पाठविला होता.

आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणातील पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जुन्या वादाचे कारण पुढे करून पोलिसांकडून तपासाची दिशा जाणीवपूर्वक बदलली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जगताप म्हणाले की, धीरज परदेशी आणि त्यांचे सहकारी वायरमनचे काम करण्यासाठी दुपारी एक ते दीडच्या सुमारास संबंधित परिसरात गेले होते. मात्र, हल्ला सायंकाळी चारनंतर झाला. पोलिसांकडून हा प्रकार जुन्या वादातून घडल्याचे आणि आरोपींना धीरज तेथे अचानक दिसल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष घटनाक्रम आणि पोलिसांकडून सांगितली जाणारी माहिती यात विसंगती असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाचा सखोल आणि वेगाने तपास सुरू असून, घटनेमागील सत्य जनतेसमोर आणले जाईल, अशी ग्वाही पोलीस अधीक्षकांनी दिली. एफआयआरमध्ये नमूद मुख्य आरोपींसह सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा हातात घेऊ नये आणि शांतता व संयम राखावा, असे आवाहन अधीक्षक सुदर्शन यांनी केले आहे.

या घटनेने महापालिका कर्मचारी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

जोपर्यंत मनपा प्रशासनाकडून मुकुंदनगर परिसरात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना संपूर्ण संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणताही कर्मचारी या परिसरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी जाणार नाही, अशी भूमिका युनियनने घेतली आहे. पदाधिकार्‍यांनी जाहीर केले की, उद्यापासून महापालिका कर्मचार्‍यांचा बेमुदत संप पुकारण्यात येणार असून, संपूर्ण शहरातील नागरी सुविधा बंद ठेवण्यात येतील. यामध्ये नागरिकांना होणार्‍या गैरसोयीबद्दल शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे