प्रभाग क्र २ मध्ये ‘डेंग्यू मुक्त अहिल्यानगर’ अभियानाचा शुभारंभ ,जनजागृतीला वेग
विद्यार्थ्यांनी घर व परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करावी - आयुक्त यशवंत डांगे

शालेय विद्यार्थी, आशा सेविका व आरोग्य सेविकांकडून नाट्य, भारूड व गीतांच्या माध्यमातून डेंग्यूबाबत प्रबोधन..
अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘डेंग्यू मुक्त अहिल्यानगर’ अभियानाच्या माध्यमातून शहरामध्ये डेंग्यू आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही घट झाली आहे.

अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक २ मध्ये ‘डेंग्यू मुक्त अहिल्यानगर’ अभियानाचा शुभारंभ आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मनपा महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती वर्षा सानप, नगरसेवक निखिल वारे, नगरसेविका संध्याताई पवार, नगरसेविका रोशनीताई त्रिंबके, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, सुनील त्रिंबके, डॉ. विजय देशपांडे, डॉ. सुदाम रानडे, डॉ. मनोहर देशपांडे, शारदा पोखरकर, योगेश पिंपळे, डॉ. वृषाली आरु, डॉ. सृष्टी बनसोडे, डॉ. आरती डापसे, आकाश त्रिंबके, धीरज उकिरडे आदी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून साठलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची निर्मिती होत असते. डेंग्यू हा जीवघेणा आजार असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराबाबत जनजागृती केली जात आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्याची तसेच साठविलेल्या पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात येत असून आवश्यक त्या ठिकाणी औषध फवारणी व धूर फवारणी केली जात आहे.




