अहिल्यानगर जिल्ह्यात 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर लाभ
अहिल्यानगर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६..पात्र शेतकऱ्यांनी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅकवर फार्मर आयडी तयार करणे अनिवार्य..
जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार २८२ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड .. लाभार्थी याद्या लवकरच टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होणार..
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’चा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बायोमेट्रिक (अंगठा) आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी तयार करणे अनिवार्य असल्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आदी कारणांमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने दि. २ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या योजनेस मान्यता दिली आहे.
योजने अंतर्गत दि. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जांपैकी दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकी असलेली आणि दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली कर्जे विचारात घेतली जाणार आहेत. पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना एकवेळ समझोता (OTS) योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यानंतर शासनाचा लाभ मिळणार असून त्यासाठी दि. ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार २८२ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येणार असून त्या ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, विकास सेवा सोसायटी कार्यालय तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या नोटीस फलकावर पाहता येतील. तसेच शासनाच्या अधिकृत कर्जमुक्ती पोर्टलवर किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात आधार क्रमांकाच्या साहाय्याने यादीतील नाव आणि संबंधित युनिक क्रमांक तपासता येईल.
यादीत नाव समाविष्ट झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.
तसेच ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी तयार झाल्यानंतरच आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. त्यामुळे अद्याप ॲग्रीस्टॅकवर नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




