ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अमेरिका व इस्रायलच्या युद्धखोरी विरोधात अहिल्यानगरमध्ये निदर्शने

अहिल्यानगर

दिल्लीगेट परिसर घोषणांनी दणाणला, ट्रम्प व नेतन्याहू यांच्या प्रतिमांना जोडे मारो..जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे ढकलण्याचा आरोप शांततेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन..

मध्यपूर्वेत कोणत्याही ठोस कारणाशिवाय युद्ध लादल्याचा आरोप करत जागतिक मानवसमाजाच्या वतीने अहिल्यानगर येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. दिल्लीगेट परिसरात पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने अमेरिका आणि इज्राईल या राष्ट्रांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

आंदोलनादरम्यान आंदोलकांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इज्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या प्रतिमांना जोडे मारून त्या पायाखाली तुडवत संताप व्यक्त केला.

“ट्रम्प मुर्दाबाद”, “नेतन्याहू मुर्दाबाद”, “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” अशा घोषणांनी संपूर्ण दिल्लीगेट परिसर दणाणून गेला. या आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, वीरबहाद्दूर प्रजापती, सचिन कुक्कडवाल, संतोष खामकर,ओम कदम,पोपट शेळके, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, पोपट भोसले, धनंजय मडके, कैलास पठारे, अशोक भोसले आदी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान ॲड. कारभारी गवळी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविताना सांगितले की, अमेरिका आणि इज्राईलच्या आक्रमक धोरणांमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. या युद्धाचे परिणाम केवळ मानवजातीपुरते मर्यादित राहणार नसून संपूर्ण सजीव सृष्टीवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

विशेषतः तेलविहिरींवरील संभाव्य हल्ल्यांमुळे पर्यावरणीय संतुलन बिघडण्याचा धोका असून हवा व पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी जगातील सुज्ञ नागरिकांनी शांततेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

अमेरिका आणि इज्राईलने विज्ञान-तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली असली तरी मानवतावाद आणि सजीव सृष्टीबद्दलची संवेदनशीलता त्यांनी गमावल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. “रिकॉन्शिओ गव्हर्नन्स” ही संकल्पना मांडत विवेकाधिष्ठित आणि निसर्गपूरक शासनपद्धतीची गरज अधोरेखित करण्यात आली.

ॲड. अशोक सब्बन यांनी आपल्या भाषणात अमेरिका हुकूमशाही पद्धतीने स्वतःच्या स्वार्थासाठी इतर राष्ट्रांवर बंधने लादत असल्याचा आरोप केला. युद्धाच्या माध्यमातून खनिज संपत्ती आणि पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून त्याचा फटका जगातील सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले. “जगाला विनाशाकडे नेणाऱ्या या युद्धाचा शेवटी माणसालाच फटका बसणार असेल, तर या सामर्थ्याचा उपयोग काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रकाश थोरात यांनी इराणमधील मुलींच्या शाळेवर बॉम्बहल्ला करून निर्दोषांची हत्या केल्याचा आरोप करत तीव्र निषेध व्यक्त केला. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याऐवजी युद्धाचा मार्ग अवलंबून संपूर्ण मानवजातीला ओलीस ठेवण्याचे काम अमेरिका आणि इज्राईल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे युद्ध थांबवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही मत व्यक्त करत आजच्या युगात भौतिक प्रगती झाली असली तरी भ्रष्टाचार, स्वार्थ, धर्मांधता आणि अनागोंदी यामुळे मानवी मूल्ये खालावत चालल्याची खंत व्यक्त केली. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी जागतिक स्तरावर विवेकनिष्ठ, पारदर्शक आणि जबाबदार शासनपद्धतीची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे