ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

MHT-CET मध्ये महा-घोटाळा? हजारो विद्यार्थ्यांचा खाजगी डेटा विकला, नगरातून संभाजी ब्रिगेड आक्रमक

महाराष्ट्राच्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा सर्वात मोठा शिक्षण घोटाळा समोर आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. एमएचटी-सीईटी पीसीएम परीक्षेसाठी अर्ज केलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा खाजगी डेटा चोरून खासगी सल्लागार संस्थांना विकल्याचा आणि याच डेटाचा वापर करून पैसे घेऊन पर्सेंटाइल वाढवून दिला जात असल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेड व प्रा. नारायण शिनगारे, प्रा. अजित खरसडे यांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

प्रा. नारायण शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार अत्यंत संघटित आहे. २०२२ मध्ये पहिल्या १०० मधील फक्त २% विद्यार्थी असे होते ज्यांना १०वी-१२वीला ६०-७०% पेक्षा कमी गुण होते. हेच प्रमाण २०२४ मध्ये ६०% वर गेले आणि यावर्षी २०२६ मध्ये तब्बल ९०% वर पोहोचले आहे. म्हणजे १०वी-१२वीत जेमतेम पास होणारे विद्यार्थी थेट सीईटीत ९९ आणि १०० पर्सेंटाइल मिळवून टॉपर होत आहेत. हे सर्व विद्यार्थी विशिष्ट सल्लागार संस्थांशी जोडलेले असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे म्हणाले, “हा फक्त डेटा लीकचा विषय नाही. विद्यार्थ्यांचे नाव, गाव, मोबाईल नंबर, ईमेल, जात-प्रवर्ग असलेली एक्सेल फाईल गोकुळ एज्यू, एलिव्हेट, प्रेरणा, विस्तार सारख्या संस्थांकडे कशी गेली? या संस्थांकडून विद्यार्थ्यांना COEP, VJTI, PICT मध्ये पैशावर थेट प्रवेश देतो म्हणून फोन येत आहेत. आज प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक होत आहे, उद्या याच डेटाचा वापर करून ऑनलाईन आर्थिक फसवणूक, इंस्टाग्रामवर मुलींना बदनाम करणे असे प्रकार घडू शकतात.”

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी सांगितले की, या घोटाळ्यामागे मोठी साखळी असल्याचा संशय आहे.

१. सीईटी सेलमधील डेटा हाताळणारे अधिकारी

२. परीक्षा घेणारी तांत्रिक कंपनी

३. डेटा विकत घेणाऱ्या सल्लागार संस्था

४. ठराविक परीक्षा केंद्रांचे मालक

यांनी मिळून हा गैरप्रकार केल्याचा संशय असून कारवाई झाली पाहिजे.

संभाजी ब्रिगेडच्या मागण्या –

१. तात्काळ FIR दाखल करून सीईटी सेलचे सर्व्हर लॉग, डेटा एक्सपोर्ट लॉग जप्त करावेत.

२. संशयित परीक्षा केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज आणि कॉम्प्युटर लॉग ताब्यात घ्यावेत.

३. १०० पर्सेंटाइल मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या रिस्पॉन्स शीटची फॉरेन्सिक तपासणी करावी.

४. सल्लागार संस्थांचे मोबाईल, लॅपटॉप आणि बँक, UPI व्यवहारांची चौकशी करावी.

५. हे प्रकरण आंतरजिल्हा असल्याने CBI, CID किंवा सायबर विभागाकडे चौकशी द्यावी.

दोन वर्षे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा हा प्रकार असून, शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाईल, असे प्रतिपादन प्रा. अजित खरसडे व प्रा. विवेक डोके यांनी केले.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, जिल्हा संपर्कप्रमुख शाम जरे, प्रा. नारायण शिनगारे, प्रा. अजित खरसडे, प्रा. विवेक डोके, प्रा. सच्चिदानंद घोणसे, प्रा. सुषमा पोळ, प्रा. सुप्रिया गांधी, प्रा. बाळासाहेब कीर्तने, सुदाम कोरडे, सचिन काकडे, महेश दानवे, प्रशांत कांबळे, दादा ठोंबरे, भीमजी कोकाटे, राजेंद्र राऊत, सद्दाम सय्यद, बापू जगताप, दिलीप लबडे, दिलीप वाळुंज आदींसह विद्यार्थी गायत्री शिरसाठ, श्रेयसी कदम, शर्वरी राऊत, प्रणव सावंत, जान्हवी भागवत, प्रियांका वरडुले, प्रणव कोटलवाड, सार्थक शिनगारे, उत्कर्ष पोटे, सार्थक अंदुरे, ओम पाटील, राज कदम आदींसह शेकडो विद्यार्थी घोषणा देत मोर्चाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आंदोलकांची भूमिका समजून घेतली व सदर तक्रारींची सायबर सेलकडून चौकशी करण्याचे निर्देश दिले असून यासंदर्भात काही गैर बाब आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे