नगर शहरातील परदेशी खून प्रकरणाचा तपास ‘एसआयटी’कडे देण्याची मागणी
सकल हिंदू समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन..

मनपाचे कर्मचारी धीरज परदेशी यांच्या खून प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सकल हिंदू समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून तपास त्यांच्याकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना देण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.
या निवेदनात खून प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिपोर्टमध्ये परदेशी यांचा खून जुन्या वादातून झाल्याचा दावा करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, संबंधित जुन्या वादाच्या फिर्यादीत परदेशी यांचे नाव नसल्याचा दावा सकल हिंदू समाजाने केला आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्हीची पडताळणी केली असता त्यातही परदेशी दिसत नसल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे पोलिसांच्या तपासातील निष्कर्ष आणि उपलब्ध पुरावे यांच्यात विसंगती आहे का, याची स्वतंत्रपणे तपासणी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
घटनेच्या दिवशी परदेशी हे सावेडी परिसरातील कामाच्या ठिकाणी उपस्थित होते, असा दावा सकल हिंदू समाजाने केला आहे. त्यांनी आपल्या वरिष्ठांना जीपीएस स्थानाचे फोटो पाठविल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.




